

FIFA World Cup controversy : २०२६ फिफा विश्वचषकात मैदानाबाहेर एका नव्या वादाची ठिगणी पडली आहे. फ्रान्सचा कर्णधार कायलियन एम्बाप्पे यांच्यावर जहरी टीका करणारी पोस्ट पॅराग्वेच्या खासदार सेलेस्टे अमरिला यांनी सोशल मीडियावर केली आहे. २०२६ फिफा विश्वचषकाच्या 'राउंड ऑफ ३२' च्या अटीतटीच्या सामन्यात फ्रान्सने पॅराग्वेचा पराभव केला. या सामन्यानंतर पॅराग्वेच्या खासदाराने एम्बाप्पेला "वसाहतवादी कॅमेरूनियन"म्हणत तो "फ्रेंच असण्याचे नाटक करतोय, तो अत्यंत मत्सरी, नवा श्रीमंत, उद्धट आणि कुरूप आहे," अशी टीका केली आणि यावरूनच वादाला तोंड फुटले आहे.
सिनेटर अमरिला यांनी त्यांच्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी एम्बाप्पेने त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे, तसेच कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.
'X' वरील आपल्या पोस्टमध्ये अमरिला यांनी स्पष्ट केले की, त्यांचा वाद वैयक्तिकरित्या एम्बाप्पेसोबत आहे, फ्रान्स देश किंवा तिथल्या राष्ट्रीय संघाशी नाही. फ्रान्स देशाशी आपले जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हा प्रश्न फक्त तुझ्या आणि माझ्या मधला आहे. मी फ्रान्सविरुद्ध कधीच काही बोलले नाही; उलट मी फ्रान्सच्या बाजूनेच आहे. मी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंत फ्रेंच शाळेत शिक्षण घेतले. तिथूनच माझे शालेय शिक्षण पूर्ण केले. आज मी जी काही आहे, ती 'कॉलेज डी लिनमॅक्युल कॉन्सेप्सिओन' मुळेच आहे आणि तिथून मिळालेल्या शिक्षणामुळेच मी आज या पदावर पोहोचले आहे. मी फ्रेंच बोलते आणि मला फ्रान्सला भेट द्यायला आवडते. त्यामुळे माझ्या पोस्टचा फ्रान्सशी काहीही संबंध नाही; अडचण फक्त तुझ्या वागण्यात आहे."
पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यान एम्बाप्पेने अत्यंत उद्धटपणा दाखवल्याचा आरोप अमरिला यांनी केला आहे. हा सामना खेळाडूंमधील जोरदार धक्काबुक्की आणि वादावादीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. फ्रान्सने हा सामना १-० असा जिंकल्यानंतर एम्बाप्पेने पॅराग्वेच्या गोलकीपरशी हस्तांदोलन करण्यास (हात मिळवण्यास) नकार दिला होता, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. यावर अमरिला यांनी म्हटलं आहे की, "तुझा उद्धटपणा आणि आमचा तिरस्कार सामन्यापूर्वीच माझ्या मनाला लागला होता, जेव्हा तू म्हणाला होतास, 'जर आपल्याला आपले हात घाणेरडे करावे लागले, तर करूया.' आम्ही मूर्ख नाही आहोत; आम्हाला नीट समजते की तुझ्या मते 'घाणेरडी गोष्ट' म्हणजे पॅराग्वेचा संघ होता आणि आम्ही सर्वजण म्हणजेच पॅराग्वे संघ आहोत. त्यानंतर तू म्हणाला होतास की ते (पॅराग्वे) त्यांचा मेकअप उतरवतील. आम्हाला हे देखील समजते की, तू मेकअपमध्ये खूप देखणा दिसतोस आणि आम्ही गरीब व खडबडीत लोक आहोत, ज्यांना मेकअप काय असतो हेही माहीत नाही. त्यावेळी माझ्या साहित संपूर्ण पॅराग्वे शांत राहिला. आम्ही ते सहन केले."
"सामन्यादरम्यान तुझे उद्धट वर्तन स्पष्ट दिसत होते. प्रत्येक खेळाडूबद्दलचा तुझा तिरस्कार असा होता जणू ते अतिशय घाणेरडे आहेत. इतकेच नाही तर तोंड न लपवता तू 'ला कोंचा दे तू माद्रे' (La concha de tu madre) हा शब्द वापरलास, जी लॅटिन अमेरिकेत अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवीसारखी मानली जाणारी वाक्यरचना आहे, आणि हे तुलाही ठाऊक आहे."
एम्बाप्पेने सामन्यानंतर पॅराग्वेच्या गोलकीपरचा आदर केला नसल्याचा आरोपही खासदार सेलेस्टे अमरिला यांनी केला आहे. सामन्यानंतर प्रतिस्पर्ध्यांमधील आदर हा युद्धाप्रमाणे किंवा शांततेत, पराभवात किंवा विजयातही अत्यंत पवित्र असतो. पण तू आमच्या संघाच्या गोलकिपरशी हात मिळवला नाहीस आणि त्याच्या तोंडावर तुझ्या विजयाचा जल्लोष केलास. हे वर्तन अत्यंत अयोग्य आहे. तू एका सेकंदात तुझा तिरस्कार, उद्धटपणा आणि तुमचे वाईट संस्कार दाखवून दिलेस. यामुळे मला आणि माझ्या संपूर्ण देशाला तीव्र दुःख झाले आहे. फ्रान्स हा शूरवीरांचा, शतकांचा इतिहास आणि सुसंस्कृतपणा असलेला देश आहे, त्यामुळे फ्रान्सने तुझ्या या वर्तनाबद्दल तुला जाब विचारला पाहिजे."
अमरिला यांनी मान्य केले की, त्यांनी आधी केलेली एक आक्षेपार्ह पोस्ट भाषेचा पुनर्विचार करून डिलीट केली होती. यांनी म्हटलं की, "माझ्या त्या पोस्ट अत्यंत रागाच्या भरात लिहिल्या गेल्या होत्या. माझ्या नसांमध्ये वाहणारे ते मिश्र रक्त—आदिवासी आणि स्पॅनिश रक्ताचे ते सुंदर मिश्रण खवळून उठले होते. जेव्हा तू शेवटच्या क्षणापर्यंत बरोबरीने लढणाऱ्या पॅराग्वेच्या महान खेळाडूंची थट्टा उडवलीस, तेव्हा मी ते लिहिले होते. मात्र, ज्या शिव्या मला मिळतात (कारण मलाही मिश्र वंशाची आणि लॅटिना असल्यामुळे घाणेरडी म्हटले जाते), त्याच भाषेत तुला उत्तर दिल्याबद्दल मला लगेचच पश्चात्ताप झाला. मला जाणवले की मी त्याच चुकीच्या पद्धतींची पुनरावृत्ती करत आहे ज्यांचा मी तिरस्कार करते, म्हणून मी ती पोस्ट डिलीट केली. मला समजते की त्यामुळे तुला त्रास झाला असेल, कारण ते अपमानास्पद होते."
सिनेटर अमरिला यांनी एम्बाप्पेला त्याचे शब्द मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे. "आता माझी अशी मागणी आहे की तू देखील तुझे विधान मागे घे आणि माझी माफी माग. मी तुझी ही अरेरावी सहन करणार नाही. तू मला ओळखत नाहीस. मी पॅराग्वे देशाची जनतेने निवडून दिलेली सिनेटर आहे. त्यापूर्वी मी जनतेने निवडून दिलेली राष्ट्रीय खासदार होते. हजारो पॅराग्वेच्या नागरिकांनी मला मतदान केले आहे आणि ते मला त्यांचा आवाज मानतात. माझ्या देशाचा आवाज बनणे, माझ्या देशाचे रक्षण करणे हे माझे मुख्य कर्तव्य आहे."पत्राचा शेवट करताना अमरिला यांनी एम्बाप्पेवर राजकीय आणि लिंगभेद आधारित हिंसेचा आरोप केला आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.