Donald Trump FIFA Controversy : मैदानाबाहेरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवली मॅच! फिफाचा नियम बदलला; USA च्या बालोगनचे ‘रेड कार्ड’ अखेर रद्द

FIFA World Cup 2026 : व्हाईट हाऊसमधून फिफाला ३ ‘ट्रम्प कॉल’
Donald Trump FIFA Red card Controversy
Published on
Updated on

न्यू यॉर्क : चालू विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगुन याला मिळालेले रेड कार्ड आणि एका सामन्याचे निलंबन फिफाने मागे घेतल्यानंतर या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे ट्रम्प यांच्या कथित हस्तक्षेपाची चर्चा रंगत असली, तरी याबाबत फिफा किंवा अमेरिकन प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

बालोगुनवरील निलंबन हटवल्यामुळे तो ७ जुलै रोजी सिएटल येथे बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या 'राउंड ऑफ १६' सामन्यात खेळू शकणार आहे. मात्र, या निर्णयामुळे फिफाच्या निर्णयप्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात असून, काही फुटबॉलप्रेमी आणि विश्लेषकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजकीय प्रभावामुळे क्रीडा संघटनांच्या निर्णयांवर परिणाम होऊ नये, अशी प्रतिक्रियाही विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांचे ३ फोन कॉल्स, अन्...

'एसोसिएटेड प्रेस' (AP) आणि 'द गार्डियन'च्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांना वैयक्तिकरित्या तीन वेळा फोन करून या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यास सांगितले होते. शिवाय, अँड्र्यू ज्युलियानी यांच्या अध्यक्षतेखालील 'व्हाईट हाऊस वर्ल्ड कप टास्क फोर्स'ने व्हीएआर (VAR) च्या स्लो-मोशन रिप्लेच्या वापरावर आक्षेप घेत थेट कायदेशीर आव्हान उभे केले अशी चर्चा रंगली आहे.

या प्रकरणावर व्हाईट हाऊस आणि फिफाने अधिकृत मौन बाळगले असले, तरी निलंबन रद्द होताच ट्रम्प यांनी 'X' आणि 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत फिफाचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, ‘योग्य निर्णय घेतल्याबद्दल आणि एका मोठ्या अन्यायाचे निवारण करून निर्णय फिरवल्याबद्दल मी फिफाचे मनापासून आभार मानतो.’

बालोगनला रेड कार्ड का मिळाले होते? नियमांचा वाद काय?

२ जुलै रोजी 'राउंड ऑफ ३२' च्या सामन्यात अमेरिकेने बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचा २-० असा पराभव केला. या सामन्यात अमेरिकेसाठी पहिला गोल करणाऱ्या बालोनगुनचा पाय बोस्नियाचा डिफेंडर तारिक मुहरेमोविचच्या घोट्यावर पडला. ब्राझिलियन पंच राफेल क्लॉज यांनी व्हिडिओ असिस्टंट रेफ्री (VAR) च्या साहाय्याने बालोनगुनला थेट 'रेड कार्ड' दाखवून मैदानाबाहेर केले होते.

वादाचे मूळ

फिफाच्या नियमांनुसार थेट मिळालेल्या रेड कार्डविरुद्ध अपील करण्याची कोणतीही तरतूद नसते. मात्र, फिफाने आपल्या शिस्तपालन नियमावलीतील 'कलम २७' चा हवाला देत हे निलंबन रद्द केले. या कलमानुसार फिफाच्या न्यायिक समितीला पंचांच्या निर्णयावर विशेषाधिकार (Veto) वापरून कारवाई स्थगित करण्याचा अधिकार आहे.

हे रेड कार्ड बालोनगुनच्या रेकॉर्डवर पुढील एक वर्ष राहणार आहे. या एका वर्षाच्या कालावधीत त्याने पुन्हा अशीच चूक केल्यास त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते.

इतिहासाची पुनरावृत्ती

फिफाच्या या 'कलम २७' चा वापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच चालू विश्वचषकात रोनाल्डोला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मिळालेली ३ सामन्यांची बंदी एका सामन्यावर आणण्यासाठी याच कलमाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे, बंदी उठण्याच्या एक आठवड्यापूर्वी रोनाल्डोने व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती.

१९६२ च्या विश्वचषकात ब्राझीलचा तत्कालीन सुपरस्टार गॅरिंचा सेमीफायनलमध्ये रेड कार्ड मिळूनही अंतिम सामना खेळला होता.

अमेरिका खुश, बेल्जियम आक्रमक

अमेरिकेचे प्रशिक्षक मॉरिसियो पोचेटिनो यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘‘हा निर्णय फुटबॉलच्या हिताचा आहे. जवळपास ९९.९ टक्के लोकांचे मत होते की बालोगनला दिलेली शिक्षा चुकीची होती. बोस्नियाविरुद्ध आधीच आम्हाला ३० मिनिटे १० खेळाडूंसह खेळावे लागले होते, त्यामुळे शिक्षा मिळालीच होती.’’

बेल्जियमचे प्रशिक्षक रुडी गार्सिया यांनी मात्र फिफावर उपरोधिक टीका केली आहे. त्यांनी 'एप्रिल फूल'चा संदर्भ देत, ‘‘फिफाच्या कार्यालयात युरोपमधील '१ एप्रिल' हा दिवस ५ जुलै रोजी साजरा केला जातो, याची मला कल्पना नव्हती. हा फुटबॉल इतिहासातील पक्षपाती निर्णय आहे.’’

रॉयल बेल्जियम फुटबॉल असोसिएशन (RBFA) फेडरेशनने कडक शब्दांत निवेदन प्रसिद्ध करून फिफावर स्वतःचेच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. खेळाची प्रतिष्ठा आणि 'फेअर प्ले'च्या मूल्यांच्या रक्षणासाठी ते न्यायालयीन पर्यायांसह सर्व संभाव्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेसमोर बेल्जियमचे आव्हान

सामन्याच्या अवघ्या २४ तास आधी प्रतिस्पर्धी संघाचा मुख्य स्ट्रायकर परत आल्यामुळे बेल्जियमची रणनीती कोलमडली आहे. मात्र, अमेरिकेसाठी हा सामना सोपा नसेल. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमध्ये झालेल्या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यांत बेल्जियमने विजय मिळवला आहे, तर अमेरिकेला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. फिफाच्या या निर्णयामुळे आता ७ जुलैच्या सामन्यात मैदानावरील थरारासोबतच मैदानाबाहेरील वादही शिगेला पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news