

विवेक कुलकर्णी
संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणारा आणि कोट्यवधी क्रीडाप्रेमींचे डोळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'फिफा वर्ल्ड कप'चा महासंग्राम आजपासून मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांत रंगणार आहे. मैदानावर फुटबॉलचा थरार आणि प्रेक्षकांमध्ये विजयाचा ज्वर निर्माण करणाऱ्या या स्पर्धेवर अवघ्या जगाचे लक्ष असणार आहे. पुढील ३८ दिवस जगातील अव्वल ४८ देश सोनेरी ट्रॉफीसाठी आणि आपल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेत जेतेपदासाठी नेहमीप्रमाणेच 'कॉटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील पुन्हा एकदा आपल्या सांबा फुटबॉलची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, गतविजेते आणि युरोपियन पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाणारे फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन हे संघ आपले वर्चस्व राखण्यासाठी मैदानात उतरतील, लॅटिन अमेरिकन फुटबॉलची ताकद असलेला अर्जेंटिना आणि नवसंजीवनी मिळालेला पोर्तुगाल संघदेखील जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
विश्वचषकाला आज सुरुवात होताना पुढील महिनाभर एकच प्रश्न तमाम फुटबॉल चाहत्यांसमोर असेल. तो म्हणजे पुढचा सम्राट कोण? मागील दोन दशकांहून अधिक काळ फुटबॉलवर मेस्सी आणि रोनाल्डो यांचे राज्य होते. आतादेखील हे दिग्गज तरुण, तडफदार सखेळाडूंच्या साथीने खांद्याला खांदा भिडवण्यासाठी सज्ज झालेच आहेत. याहीशिवाय, महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा आणखी पराकोटीस पोहोचते आहे. नवी पिढी मैदानावर उतरते आहे. नवे चेहरे, नवी स्वप्ने आणि नवी स्पर्धा २०२६ चा विश्वचषक हा केवळ विजेत्या संघाचा शोथ नसून फुटबॉलच्या पुढच्या सुपरस्टारचा शोधही असणार आहे.
या शर्यतीत सर्वात पुढे दिसतो तो किलियन एम्बाप्पे, वेग, गोल करण्याची क्षमता आणि मोठ्या सामन्यांतील प्रभाव. २०२६ मध्ये फ्रान्स विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, तर त्यामागचे सर्वांत मोठे कारण एम्बाप्पे हेच असेल, गतविजेता अर्जेंटिना अजूनही भक्कम आहे. मेस्सी असो वा नसो, या संधाने जिंकण्याची सवय लावून घेतली आहे. ज्युलियन आल्वारेझ, एन्झो फनडिज आणि अॅलिस्टर यांसारखे खेळाडू आता मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अर्जेंटिनाची ताकद एका व्यक्तीत नाही; ती संपूर्ण संघरचनेत आहे.
इंग्लंडकडे यंदा ज्यूड बेलिंगहॅम आहे. त्याच्यासोबत हॅरी केन आणि फिल फोडेन असल्याने इंग्लंडकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल. स्पेनकडे पाहिले की एक नाव वारंवार समोर येते. लॅमिन यामाल, अजून वयाने तरुण; पण खेळात प्रचंड परिपक्वता.
ब्राझीलची गोष्ट मात्र वेगळी आहे. प्रतिभेची कमतरता नाही. विनिसियस ज्युनियर, रोड्रिगो आणि एंड्रिक यांच्यासारखे खेळाडू कोणत्याही बचावफळीची झोप उडवू शकतात; पण ब्राझीलचा प्रश्न प्रतिभेचा नसून सातत्याचा आहे आणि मग असतात ते 'डार्क हॉर्स, मोरोक्को, जपान, अमेरिका किंवा डेन्मार्क हे संघ कदाचित विजेतेपदाचे प्रबळ दावेदार नसतील; पण मोठ्या संघांची गणिते बिघडवण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे. गेल्या काही वर्षांत फुटबॉलमधील अंतर कमी झाले आहे. नावापेक्षा कामगिरी अधिक महत्त्वाची ठरते. म्हणूनच २०२६ चा विश्वचषक वेगळा वाटतो.
एका बाजूला एम्बाप्पे विश्वफुटबॉलचा निर्विवाद राजा बनण्याच्या उंबरठ्चावर उभा आहे. दुसऱ्या बाजूला बेलिंगहॅम, यामाल आणि विनिसियस यांसारखे दावेदार त्याला आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. अर्जेंटिना आपले वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करेल, फ्रान्स मुकुट परत मिळवू पाहील. इंग्लंड इतिहास बदलण्याचे स्वप्न पाहील आणि जगभरातील अब्जावधी चाहत्यांप्रमाणे एक प्रश्न कायम राहील. पुढचा विश्वविजेता कोण? उत्तर मैदानावर मिळेल; पण त्या उत्तराचा प्रवासच खऱ्या अर्थाने अधिक संघर्षपूर्ण असणार आहे.