FIFA World Cup 2026 : आयव्हरी कोस्टचा पराभव करत जर्मनीची बाद फेरीत धडक

नेदरलँड्सचा विजय, इक्वाडोर-कुराकाओ सामना ड्रॉ
FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ च्या ग्रुप 'इ' मधील सामन्यात जर्मनीने आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव करत बाद फेरीसाठी पात्रता मिळवली. Pudhari
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ च्या १०व्या दिवशी जर्मनी आणि नेदरलँड्सने आपापल्या सामन्यांमध्ये एकतर्फी विजय नोंदवला. यामुळे बाद फेरीचे (नॉकआउट) चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. तर ग्रुप 'इ' मधील इक्वाडोर आणि कुराकाओ यांच्यातील सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला.

आयव्हरी कोस्टचा पराभव करत जर्मनी बाद फेरीत दाखल

फिफा विश्वचषक २०२६ च्या ग्रुप 'इ' मधील सामन्यात जर्मनीने शानदार पुनरागमन करत आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव केला. टोरँटो स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एकवेळ जर्मन संघ मागे पडला होता;परंतु डेनिज उन्दावच्या दोन गोलच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला. ६८व्या मिनिटाला सब्स्टीट्यूट डेनिज उन्दावने शानदार गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलनंतर सामना अधिकच रोमांचक झाला. आठ मिनिटांच्या इंज्युरी टाईमनंतर पंचांनी (रेफ्री) अंतिम शिट्टी वाजवली आणि जर्मनीने २-१ ने सामना आपल्या नावावर केला. फ्रँक केसीच्या गोलमुळे पिछाडीवर पडल्यानंतरही जर्मन संघाने संयम आणि आक्रमकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. डेनिज उन्दावच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जर्मनीने सलग दुसरा विजय नोंदवला आणि ६ गुणांसह ग्रुप 'इ' मध्ये अव्वल स्थानावर राहून बाद फेरीसाठी पात्रता मिळवली.

नेदरलँड्सकडून स्वीडनचा पराभव

ग्रुप 'एफ' मधील सामन्यात नेदरलँड्सने दमदार कामगिरी करत स्वीडनचा ५-१ असा दणदणीत पराभव केला. ह्युस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या ३५व्या सामन्यात नेदरलँड्सने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. स्वीडनला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. नेदरलँड्सकडून ब्रायन ब्रॉबी आणि कॉडी गॅक्पो यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर क्रायसेन्सिओ समरविलेने एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. शानदार विजयासह नेदरलँड्सने ग्रुप 'एफ' मध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. संघाने आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट प्रदर्शन केले. दुसरीकडे, स्वीडनला स्पर्धेतील आपला पुढील प्रवास सोपा करण्यासाठी आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

इक्वाडोर-कुराकाओ सामना बरोबरीत सुटला

इक्वाडोर आणि कुराकाओ यांच्यात ग्रुप 'इ' चा सामना खेळला गेला. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. कुराकाओच्या तुलनेत पहिल्या हाफमध्ये इक्वाडोरने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु त्यांना यश आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये आघाडी घेण्यावर दोन्ही संघांचे लक्ष होते. परंतु, दुसरा हाफ संपल्यानंतर आणि इंज्युरी टाईममध्येही एकही गोल न झाल्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत (०-०) संपला.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup Gilberto Mora: कोण आहे हा गिलबर्टो मोरा? १७ वर्षीय फुटबॉलपटूने फिफा विश्वचषकात ९६ वर्षांचा विक्रम मोडला!

इक्वाडोर-कुराकाओचे आव्हान जवळपास संपुष्टात

इक्वाडोर आणि कुराकाओसाठी बाद फेरीचा मार्ग आता कठीण झाला आहे. जर्मनी आणि आयव्हरी कोस्ट अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. इक्वाडोर आणि कुराकाओचे दोन सामन्यांत एक पराभव आणि एक ड्रॉमुळे प्रत्येकी १-१ गुण आहेत आणि ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या ग्रुपमधून जर्मनी बाद फेरीत पोहोचला आहे, तर इक्वाडोर-कुराकाओचे पुढील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

FIFA World Cup 2026
Lionel Messi World Cup Record: टायगर इज बॅक! लिओनेल मेस्सीची हॅट्ट्रिक... रोनाल्डोच्या खास रेकॉर्डची देखील केली बरोबरी

फिफा विश्वचषकातील आजचे वेळापत्रक

विश्वचषक २०२६ च्या ११व्या दिवशीही फुटबॉल चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

  • स्पेन विरुद्ध सौदी अरेबिया: हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता अटलांटा येथे खेळवला जाईल.

  • बेल्जियम विरुद्ध इराण: हा सामना लॉस एंजेलिस येथे रात्री १२:३० वाजता होईल.

  • उरुग्वे विरुद्ध केप वर्डे: हा सामना मियामी येथे पहाटे ३:३० वाजता खेळवला जाईल.

  • न्यूझीलंड विरुद्ध इजिप्त: दिवसातील शेवटचा सामना व्हँकुव्हर येथे सकाळी ६:३० वाजता खेळवला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news