

Gautam Gambhir: टी-20 मालिकेत आयर्लंडकडून भारताला 0-2 असा ऐतिहासिक पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. चाहत्यांसोबतच आता आइसलँड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटनेही भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा अवघ्या एका धावाने पराभव झाल्यानंतर आयर्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
"गौतम गंभीर यांना आमच्या प्रशिक्षकपदासाठी आमंत्रण देण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र, इतक्या बलाढ्य भारतीय संघाला घेऊन आयर्लंडमध्ये पराभव पत्करण्याचं जे 'असामान्य कौशल्य' त्यांनी दाखवलं आहे, त्यासाठी वेगळ्याच दर्जाची प्रतिभा लागते." या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
गौतम गंभीर यांच्यावर आयर्लंड क्रिकेटने उपहासात्मक टिप्पणी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी भारताला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अपेक्षित यश मिळाले नव्हते.
त्यावेळीही आयर्लंड क्रिकेटने, "गौतम गंभीर यांना आमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आमच्याकडे आधीच प्रशिक्षक आहेत आणि आम्ही 2025 मध्ये आमचे 75 टक्के सामने जिंकले आहेत," अशी उपरोधिक पोस्ट केली होती.
राहुल द्रविड यांच्यानंतर जुलै 2024 मध्ये गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र त्यांच्या कार्यकाळात काही मोठे पराभव भारतीय संघाच्या वाट्याला आले आहेत.
2024 मध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 अशी कसोटी मालिका गमवावी लागली. तब्बल 12 वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर वनडे मालिकेतही न्यूझीलंडकडून पराभव झाला.
आता विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागल्याने संघाच्या रणनीती आणि प्रशिक्षकांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असली तरी पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन करण्याचे आव्हान आता गौतम गंभीर आणि टीम इंडियासमोर असेल.