

बेलफास्ट; वृत्तसंस्था : राजस्थानच्या टोंक येथील मूळ रहिवासी आणि पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जय मुंदडाच्या घातक गोलंदाजीने भल्याभल्या दिग्गजांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला चांगलेच जेरीस आणले आणि त्याच्या याच भेदक गोलंदाजीमुळे आयपीएल स्टार्सचा भरणा असलेला भारतीय संघाला आयर्लंडने शब्दश: चारीमुंड्या चीत केले. आयर्लंडने यासह २ सामन्यांच्या या मालिकेत भारताला २-० अशा एकतर्फी फरकाने व्हॉईटवॉश दिला.
आयर्लंडच्या क्रिकेट संघाने येथे टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या १ धावेने पराभूत करत मालिका २-० अशी खिशात घातली. २०११ च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर आयरीश क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा क्षण मानला जात आहे.
अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक लढतीत आयर्लंडच्या गोलंदाजांनी दडपण झुगारून उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावरच गारद केले. विजयासाठी १५५ धावांचे आव्हान असताना भारतीय संघाला ९ बाद १५३ धावांवर समाधान मानावे लागले. तिलक वर्माने सर्वाधिक ५५ धावांचे योगदान दिले. हर्षित राणाने शेवटच्या टप्प्यात हाणामारी केली. मात्र, तरीही आयर्लंडने अवघ्या एका धावेने निसटता विजय संपादन करत ऐतिहासिक मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले.