

Explained Messi Kolkata Event Chaos: कोलकात्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाल्याच्या घटनेनंतर पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सताद्रु दत्ता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सॉल्ट लेक स्टेडियममधील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना डीजीपी राजीव कुमार म्हणाले की, कार्यक्रमाच्या आयोजनात आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्थापन झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आधीच एक समिती स्थापन केली असून, ही समिती सर्व बाबींची बारकाईने तपासणी करत आहे.
या घटनेबाबत पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) जावेद शमीम यांनी सांगितले की, “आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तपासाच्या अनुषंगाने एफआयआर दाखल करण्यात आला असून मुख्य आयोजक सताद्रु दत्ता यांना अटक करण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “आयोजकांनी चाहत्यांचे तिकीटाचे पैसे परत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ही प्रक्रिया कशी राबवता येईल, याचा आम्ही आढावा घेणार आहोत.”
जावेद शमीम यांनी स्पष्ट केले की, परिसरातील वाहतूक सुरळीत असून नागरिक आपापल्या घरी परतले आहेत. “ही मोठी घटना असली तरी ती सॉल्ट लेक स्टेडियमपुरती मर्यादित होती. आज जे काही घडले, त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना शिक्षा होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही योग्य कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी कार्यक्रमात झालेल्या गोंधळाबद्दल जाहीर माफी मागितली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ममता बनर्जी म्हणाल्या, “सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज जी अव्यवस्था पाहायला मिळाली, त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ आणि व्यथित झाले आहे. हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहते आपला आवडता फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमले होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “या दुर्दैवी घटनेबद्दल मी लिओनल मेस्सी तसेच सर्व क्रीडाप्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांची मनापासून माफी मागते.”
मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, निवृत्त न्यायमूर्ती अशिम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीत मुख्य सचिव तसेच गृह आणि अतिरिक्त मुख्य सचिव सदस्य असतील.