

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या पहिल्याच सामन्यात भारताचा रन मशिन विराट कोहली याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्यात यश मिळवले, तर त्याच्या नावावर एक असा विश्वविक्रम नोंदवला जाईल, जो खऱ्या अर्थाने इतिहास ठरेल. सध्या, कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतके जमा आहेत. जर त्याने आणखी एक शतक झळकावले, तर जागतिक क्रिकेटमध्ये एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक ५१ शतकांचा ऐतिहासिक विक्रम नावावर असलेल्या विराट कोहलीला आपला हा विश्वविक्रम आणखी भक्कम करण्यासाठी आणि ५२ वे शतक झळकावण्यासाठी केवळ एका शतकाची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये आपली शतकांची संख्या ५२ वर नेऊन, 'किंग कोहली' आपली अतुलनीय फलंदाजी पुन्हा एकदा सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे.
कोहलीने २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळताना ५० वे शतके पूर्ण केले. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडीत काढला. आता जर कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक शतक झळकावले, तर तो तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडेल आणि सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनेल.
सध्या, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन्ही भारतीय दिग्गज अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१-५१ शतकांसह बरोबरीत आहेत.
एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. यापूर्वी हे दोन्ही खेळाडू भारतासाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान एकत्र खेळले होते आणि आता ते फक्त ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी उपलब्ध आहेत. माजी भारतीय कर्णधार असलेल्या या दोन्ही खेळाडूंनी नेटमध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजीचा कसून सराव केला.
भारतीय संघ २९ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी बुधवार आणि गुरुवारी दोन गटांमध्ये येथे दाखल झाला आहे. नेट्समध्ये बराच वेळ घालवल्यानंतर रोहित शर्माला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घ चर्चा करतानाही पाहिले गेले.