

Dhruv Jurel Jai Jawan Jai Kisan Tattoo: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने नाबाद 115 धावांची शानदार खेळी केली. मात्र, जुरेलच्या शतकाइतकीच त्याच्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनचीही चर्चा रंगली. शतक पूर्ण होताच त्याने प्रथम सलाम केला आणि त्यानंतर आपल्या बायसेप्सवर असलेला ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू दाखवला. या खास सेलिब्रेशनमागे त्याच्या वडिलांशी आणि आजोबांशी जोडलेली एक अतिशय भावुक कहाणी आहे.
शतकानंतर केलेला सलाम आणि टॅटू दाखवण्यामागचे कारण स्वतः ध्रुव जुरेलने सांगितले. त्याचे आजोबा शेतकरी होते, तर वडिलांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यामुळेच त्याने आपल्या शरीरावर ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा टॅटूच्या स्वरूपात कोरून घेतली आहे.
जुरेल म्हणाला की, “माझे आजोबा शेतकरी होते आणि माझे वडील सैनिक होते. हीच माझी ओळख आहे. मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे शतकानंतरचा तो सलाम माझ्या वडिलांसाठी आणि आजोबांसाठी होता.”
ध्रुव जुरेलच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. त्याने 115 धावांची नाबाद खेळी करताना संयम, परिस्थितीचे भान आणि परिपक्व फलंदाजीचे उत्तम दर्शन घडवले.
जुरेल 99 धावांपर्यंत अतिशय सहजपणे पोहोचला होता. मात्र, शतकासाठी केवळ एक धाव हवी असताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जुरेलने सांगितले की, 99 धावांपर्यंत त्याला धावा सहज मिळत होत्या. मात्र, 99 वर पोहोचल्यानंतर असीथा फर्नांडोने अधिक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. श्रीलंकेचे क्षेत्ररक्षणही अधिक चपळ झाले होते.
अखेर जुरेलने फर्नांडोच्या चेंडूवर सरळ फटका मारला. त्याला वाटले की चेंडू गोलंदाजाच्या पुढून जाईल आणि क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वी एक धाव मिळेल. मात्र, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूकडे येताना दिसताच त्याच्या मनात क्षणभर, “अरे, मी हे काय करून बसलो?” असा विचार आला.
शतकासाठी धावताना जुरेलने अखेर डाइव्ह मारली आणि एक धाव पूर्ण करत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने वडील आणि आजोबांना समर्पित खास सेलिब्रेशन केले.
या सामन्यात ध्रुव जुरेलने ऋषभ पंतसोबत 112 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघेही यष्टीरक्षक-फलंदाज असले तरी त्यांच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये मोठा फरक आहे.
ऋषभ पंतने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत 63 धावा केल्या. दुसरीकडे जुरेलने संयमाने आणि परिस्थितीनुसार फलंदाजी करत डाव सांभाळला.
जुरेलने सांगितले की, पंतसोबत फलंदाजी करणे हा त्याच्यासाठी खास अनुभव असतो. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यांवर भारतासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे मैदानावर फलंदाजी करताना जुरेल त्याच्याकडून सातत्याने सल्ला घेत असतो.
वेगवेगळ्या परिस्थितीत कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कसे खेळायचे, कोणत्या वेळी आक्रमक व्हायचे आणि कधी संयम दाखवायचा, याबाबत तो पंतशी चर्चा करत असल्याचे जुरेलने सांगितले.
पंतसोबत फलंदाजी करताना त्याच्यासारखे आक्रमक फटके खेळण्याची इच्छा होत नाही का, असा प्रश्न जुरेलला विचारण्यात आला. त्यावर त्याने अगदी स्पष्ट उत्तर दिले.
जुरेल म्हणाला की, कसोटी क्रिकेटचे सौंदर्यच प्रत्येक खेळाडूची वेगळी शैली असण्यात आहे. पंतसोबत खेळणे हा चांगला अनुभव आहे, पण आपण त्याच्यासारखे खेळू शकत नाही.
“पंत लहानपणापासून ज्या पद्धतीने खेळत आला आहे, ती त्याची स्वतःची वेगळी शैली आहे,” असे जुरेलने सांगितले.
आपल्या फलंदाजीबाबत जुरेलने सांगितले की, कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचे आणि कोणत्या गोलंदाजाचा स्पेल सावधपणे खेळून काढायचा, याचा तो सतत विचार करत असतो.
दोघेही यष्टीरक्षक असल्याने आणि मधल्या फळीत फलंदाजी करत असल्याने मैदानाच्या मध्यभागी त्यांच्यात खेळाबाबत चांगली चर्चा होत असल्याचेही त्याने सांगितले.