

जळगाव : केंद्रात क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा असलेल्या जळगावमध्येच क्रीडाभवनाची दुरवस्था झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेषतः भुसावळ तालुक्यातील क्रीडाभवन, ज्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्चून इमारत उभारण्यात आली, ती आज पूर्णपणे निष्क्रिय आणि दुर्लक्षित स्थितीत दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये क्रीडाभवने बांधण्यात आली आहेत, मात्र अनेक ठिकाणी त्यांचा वापर न होता इमारती निष्क्रिय आहेत. भुसावळ येथील झूग्याच्या मंदिराजवळील क्रीडाभवनाची अवस्था विशेष चिंताजनक आहे. या इमारतीचे दरवाजे, खिडक्या, पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत, तर परिसराचीही साफसफाई नाही. विशेष म्हणजे, या इमारतीत आजवर एकही स्पर्धा आयोजित झालेली नाही.
या इमारतीचा क्रीडा विभागाकडे औपचारिक हस्तांतरण झाले आहे की नाही, हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि क्रीडा विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही तयार नाही.
दुसरीकडे, याच परिसरात सहा कोटी १९ लाख रुपये खर्चून नव्या क्रीडाभवनाचे काम सुरू असून, त्यात स्विमिंग पूल, बास्केटबॉल ग्राउंड, व्हॉलीबॉल कोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश आहे. पण जुन्या इमारतीचा वापर न होता नवे प्रकल्प उभारणे म्हणजे स्रोतांची आणि निधीची नासाडीच ठरत आहे.
जळगाव शहरातील क्रीडाभवनाच्या मैदानावर सिंथेटिक ट्रॅक उभारणीसाठी गेल्या वर्षीच निधी मंजूर झाला होता. मात्र, PWD च्या विलंबाने टेंडर प्रक्रियेत उशीर झाला. परिणामी, शालेय क्रीडा स्पर्धांच्या पूर्वी ट्रॅक तयार होण्याचे उद्दिष्ट फसले आहे. पावसाळाही सुरू झाला असून सध्या फक्त मुरमाचे खडे टाकून काम अधांतरी आहे.
“सिंथेटिक ट्रॅकसाठी निधी उपलब्ध असून सप्टेंबरपूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. भुसावळच्या क्रीडाभवनाबाबत माहिती तालुका क्रीडा अधिकारी देऊ शकतात,”
रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव