

मुंबई ः महसूल विभागातील तलाठी ते उपजिल्हाधिकारी पदावरील सर्वांना आता रोज फेसअॅपद्वारे हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. फेसअॅपवर हजेरी दाखवली नाही, तर संबंधिताच्या नावापुढे गैरहजेरीची नोंद केली जाईल. विशेष म्हणजे, ज्या गावात नोकरी आहे, तिथूनच उपस्थिती लावावी लागणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्णनिर्णय घेतला आहे.
हजेरीची ही नवी पद्धत ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे. यातील महत्त्वाची अट अशी आहे की, संबंधित अधिकार्याने आपली उपस्थिती ज्या गावात त्याची नेमणूक आहे, त्याला तेथूनच हजेरी लावावी लागणार आहे. यामुळे कार्यक्षेत्राच्या ठिकाणी न जाता कार्यालयीन उपस्थिती दाखवण्याच्या प्रकाराला आळा बसेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
- महसूल कर्मचार्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे
- सामान्य जनतेला वेळेवर सेवा मिळवून देणे
- प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी निर्माण करणे
- अधिकार्यांच्या नियमित उपस्थितीबद्दल जागरूकता आणणे
हा निर्णय राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाशी संबंधित 7/12 उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, जमीन मोजणी, फेरफार नोंदणी यासारख्या सेवांसाठी नागरिकांना कार्यालयात वारंवार जावे लागते. त्यामुळे अधिकार्यांची नियमित उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.