

India CWG 2026 Boxing : ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस भारतीय बॉक्सिंगसाठी ऐतिहासिक ठरला. प्रीती पवार आणि जॅस्मिन लंबोरिया यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताला दोन सुवर्णपदके मिळाली, तर जादुमणीने रौप्यपदक आपल्या नावे केले. दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकासह भारतीय मुष्टियोद्ध्यांनी जागतिक मंचावर पुन्हा एकदा आपल्या वर्चस्व सिद्ध केले आहे.
भारताची स्टार बॉक्सर आणि जागतिक विजेती जॅस्मिन लंबोरिया हिने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात जॅस्मिनने नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्श हिचा ५-० असा एकतर्फी पराभव करत भारताला 'ग्लासगो २०२६' मधील सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. तत्पूर्वी भारताची स्टार महिला बॉक्सर प्रीती पवारने ५४ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.अंतिम फेरीत प्रीतीने कॅनडाच्या स्कार्लेट डेलगाडोवर एकतर्फी मात केली. राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
अंतिम सामन्याची सुरुवात दोन्ही बॉक्सर्सनी अत्यंत सावधपणे केली. जॅस्मिनने मारलेले अचूक पंच निर्णायक ठरले. पंचांनी ३-२ अशा स्प्लिट निर्णयाने पहिली फेरी जॅस्मिनच्या बाजूने दिली.दुसऱ्या फेरीत जॅस्मिनने अत्यंत संयम राखत योग्य वेळेचा अंदाज घेऊन प्रभावी प्रहार केले. जॅस्मिनचे रिंगवरील नियंत्रण आणि अचूकता पाहून पंचांनी ही फेरी ५-० अशी पूर्णपणे जॅस्मिनच्या बाजूने दिली. यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करताना जॅस्मिनने सामन्यावर आपली पकड घट्ट केली होती.सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वॉल्शला तिसऱ्या फेरीत मोठ्या धक्क्याची गरज होती, परंतु जॅस्मिनने तिला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. बचाव आणि आक्रमणाचा उत्तम मेळ घालत जॅस्मिनने तिसरी फेरी ४-१ अशी जिंकली. अखेर पंचांनी ५-० अशा एकमताने जॅस्मिनला विजयी घोषित केले.या विजयासह जॅस्मिनने जागतिक अजिंक्यपदानंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकावरही आपले नाव कोरले आहे.
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) भारताचा युवा बॉक्सर जादुमणी सिंगला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉय डिक्सनने जादुमणीचा ५-० असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे जादुमणीला रौप्यपदकावर समाधानी राहावे लागले असले, तरी त्याने संपूर्ण सामन्यात दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली.