IPL New Record : उर्विल पटेलचे 13 चेंडूंत वादळी अर्धशतक! IPL मधील संयुक्त जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी

चेन्नईचा तोडीस तोड प्रत्युत्तर देत एलएसजीवर सहज विजय
IPL New Record : उर्विल पटेलचे 13 चेंडूंत वादळी अर्धशतक! IPL मधील संयुक्त जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी
Published on
Updated on

चेन्नई : चेपॉकच्या मैदानावर उर्विल पटेलने अवघ्या 13 चेंडूंत आयपीएल इतिहासातील संयुक्त वेगवान अर्धशतक झळकावत चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपर जायंटस्‌‍विरुद्ध 5 गडी राखून दणकेबाज विजय मिळवून दिला. प्रारंभी जोश इंग्लिसने 33 चेंडूंत 85 धावा फटकावल्यानंतर लखनौने 8 बाद 203 धावांची जोरदार मजल गाठली. मात्र, प्रत्युत्तरात चेन्नईनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत सहज विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले.

या विजयासह चेन्नईचे 12 गुण झाले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी झेपावले आहेत. दुसरीकडे, सलग पराभवामुळे लखनौ 11 सामन्यांत केवळ 6 गुणांसह गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी कायम आहे.

विजयासाठी 204 धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनने आक्रमक सुरुवात केली. सॅमसन 28 धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या उर्विल पटेलने लखनौच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. त्याने अवघ्या 13 चेंडूंत अर्धशतक ठोकून यशस्वी जैस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली. उर्विल आणि गायकवाड (42) बाद झाल्यानंतर सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला. अखेरच्या षटकात 10 धावांची गरज असताना कर्णधार ऋषभ पंतने चेंडू एडन मार्करामच्या हाती सोपवला. मात्र, शिवम दुबेने सलग दोन षटकार खेचत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लिशची फटकेबाजी व्यर्थ

तत्पूर्वी, फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर लखनौने 20 षटकांत 8 बाद 203 धावा केल्या होत्या. जोश इंग्लिशने केवळ 17 चेंडूंत अर्धशतक झळकावत हल्ला चढवला. त्याने 33 चेंडूंत 85 धावांची खेळी केली. मात्र, जेमी ओव्हरटनने ठरावीक अंतराने बळी घेत लखनौला आणखी मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. शाहबाज अहमदने नाबाद 43 धावा करत संघाला 200 चा टप्पा ओलांडून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news