

चेन्नई : आयपीएल २०२६ च्या हंगामात खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणीत सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) अखेर एक महत्त्वाचा बदल केला आहे. युवा फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडल्यानंतर, संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश मधवालचा संघात समावेश केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईच्या संघाला सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत आहे. सलामीच्या काही सामन्यांत आपल्या फलंदाजीने छाप पाडणारा युवा खेळाडू आयुष म्हात्रे याला १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीदरम्यान हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने चेन्नईला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर, मधल्या षटकांत आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करू शकणाऱ्या आकाश मधवालला संधी देऊन चेन्नईने आपली गोलंदाजीची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.
मूळचा उत्तराखंडचा असलेला आकाश मधवाल यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या दिग्गज फ्रँचायझींचा भाग राहिला आहे. आकाशने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०२४ च्या हंगामातही त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, तर गेल्या वर्षी तो राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात होता. या वर्षीच्या लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती; मात्र आता आयुष म्हात्रेचा बदली खेळाडू म्हणून चेन्नईने त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
आकाश मधवालने आतापर्यंत आयपीएलच्या तीन हंगामांत एकूण १७ सामने खेळले आहेत. यात त्याने २५.६५ च्या सरासरीने २३ बळी मिळवले आहेत. जरी त्याचा इकॉनॉमी रेट १०.०६ राहिला असला, तरी कठीण प्रसंगात बळी घेण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी २०२३ च्या हंगामात पाहायला मिळाली होती, जेव्हा त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या ५ धावा देऊन ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात सामील झाल्यामुळे आकाशला पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवण्याची संधी मिळाली आहे. अनुभवी महेंद्रसिंह धोनी आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आकाशची ही नवीन खेळी कशी ठरते, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.