Cristiano Ronaldo retirement : रोनाल्डोचा डोळ्यांत अश्रू आणणारा निरोप! पुर्तगालच्या लाल जर्सीला 'CR7'चा अलविदा

VIDEO : २३ वर्षांची ऐतिहासिक कारकीर्द थांबली, क्रिस्टियानो रोनाल्डोचा देशवासीयांना भावुक ‘सलाम’
Cristiano Ronaldo retirement : रोनाल्डोचा डोळ्यांत अश्रू आणणारा निरोप! पुर्तगालच्या लाल जर्सीला 'CR7'चा अलविदा
Published on: 
Updated on: 

लिसबन : जागतिक फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातील आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अखेर पूर्णविराम दिला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करताना रोनाल्डोने ‘पोर्तुगाल सदैव माझ्या हृदयात राहील’ अशी अत्यंत भावुक भावना व्यक्त केली.

रोनाल्डोने देशासाठी खेळलेला शेवटचा आणि २३४ वा सामना सप्टेंबर महिन्यात वेल्सविरुद्ध झाला होता, ज्यामध्ये पोर्तुगालने १-० असा विजय मिळवला होता. त्यापुढील सामन्यात राखीव खेळाडूंच्या बाकावर बसावे लागल्यामुळे रोनाल्डोने सामना संपण्यापूर्वीच पोर्तुगालचे प्रशिक्षण शिबीर सोडले होते. या शिस्तभंगामुळे त्याच्यावर २५५ युरोचा दंड आणि ३० दिवसांची बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांची माफी मागत आणि भूमिकेचे स्पष्टीकरण देत प्रसिद्ध केलेल्या १,७४० शब्दांच्या निवेदनात आपण निवृत्त होणार नसल्याचे त्याने नमूद केले होते. मात्र, गुरुवारी समाजमाध्यमांवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या दिग्गज आघाडीच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तात्काळ निवृत्ती घेत असल्याची अनपेक्षित घोषणा केली.

आपल्या निवेदनात भावनांना वाट मोकळी करून देताना रोनाल्डोने म्हटले की, राष्ट्रीय संघाची सात क्रमांकाची जर्सी परत सोपवण्याची वेळ अखेर आली आहे. ही जर्सी कधी केवळ माझीच होती अशी भावना माझ्या मनात नव्हती, परंतु सलग २३ वर्षे ही जर्सी परिधान करण्याचे, तिचा सन्मान राखण्याचे आणि जगभरातील मैदानांवर तिचा अभिमान बाळगण्याचे भाग्य आणि मोठी जबाबदारी मला लाभली. आता ही जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. काही निर्णय केवळ बुद्धीने नव्हे तर मनानेही घेतले जातात, त्यामुळे हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते, असेही त्याने नमूद केले.

रोनाल्डो पुढे म्हणाला की, ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झालेला आणि माझे आयुष्य कायमचे बदलून टाकणारा हा अविस्मरणीय प्रवास आता संपला आहे. मागे वळून पाहताना मला केवळ सामने, गोल, विक्रम किंवा चषक दिसत नाहीत. गोल काळानुसार विस्मरणात जातात, चषक संग्रहालयात जमा होतात आणि विक्रमही कधी ना कधी मोडले जातात; परंतु एक गोष्ट काळ कधीही पुसू शकत नाही, ती म्हणजे लोकांच्या हृदयात आपण निर्माण केलेले अढळ स्थान.

पुरुष आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात रोनाल्डोइतके २३४ सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक १४६ गोल नोंदवण्याचा पराक्रम जगातील इतर कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही. पाच वेळा प्रतिष्ठेचा 'बॅलोन डी'ओर' पुरस्कार पटकावणाऱ्या रोनाल्डोने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच्याच नेतृत्वाखाली पोर्तुगालने २०१६ मध्ये मानाची युरो चषक स्पर्धा जिंकून इतिहास रचला, तसेच दोन नेशन्स लीग स्पर्धांचे विजेतेपदही देशाच्या नावावर केले.

चालू वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले होते, तरीही रोनाल्डोने या स्पर्धेत तीन गोल नोंदवले होते. सलग सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणारा आणि त्या प्रत्येक स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो हा जगातील एकमेव खेळाडू ठरला असून, ही त्याची अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल असे त्याने आधीच स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी यानेही ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि त्याने बेनिनविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

आदर्श परिस्थिती असती तर रोनाल्डोला आणखी एक मोठे विजेतेपद जिंकूनच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सांगता करायला नक्कीच आवडले असते. नुकतीच पार पडलेली विश्वचषक स्पर्धा त्याची शेवटची ठरेल यावर क्रीडाविश्वात एकमत झाले होते, तरीही आणखी एक यूईएफए नेशन्स लीग विजेतेपद पटकावण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली होती. मात्र, संघाचे नवे प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळेच रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. या निर्णयाच्या वेळेवर आणि रोनाल्डोच्या भूमिकेवर पुढील काळात बरीच चर्चा आणि विश्लेषण होईल. पुढील आठवड्यात नवा संघ जाहीर करताना प्रशिक्षक जिझस यांनाही या संदर्भातील अनेक कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागेल यात शंका नाही. मात्र सध्या तरी या सर्व वादांच्या पलीकडे जाऊन जागतिक क्रीडा जगतातील एका अद्वितीय आणि महान कारकिर्दीकडे कौतुकाने पाहण्याची ही वेळ आहे.

रोनाल्डोने २००३ मध्ये पोर्तुगालच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले, तेव्हा आजचा नवा उदयोन्मुख तारा लामिन यामाल याचा जन्मही झाला नव्हता. त्यानंतरच्या प्रदीर्घ प्रवासात रोनाल्डोने अत्यंत मोजकेच सामने गमावले. त्याने २३४ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि तब्बल १२ मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोर्तुगालचा झेंडा फडकवला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने नोंदवलेला १४६ गोलांचा विश्वविक्रम मोडणे भविष्यात कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरेल.

विशेष कौतुकाची बाब म्हणजे, त्याने नोंदवलेल्या १४६ गोलांपैकी तब्बल ९४ गोल हे वयाची तिशी ओलांडल्यानंतर केलेले आहेत, जे त्याच्या अफाट शारीरिक तंदुरुस्तीची आणि सातत्याची साक्ष देतात. अलीकडच्या काळात पोर्तुगालच्या संघात त्याच्या अनिर्बंध स्थानावर काही प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी त्यामुळे त्याने मिळवलेल्या अलौकिक यशाचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही.

पोर्तुगालला २०१६ च्या युरो स्पर्धेचे पहिलेवहिला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात रोनाल्डोचा सिंहाचा वाटा होता. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर जावे लागल्यानंतरही सीमा रेषेवर उभे राहून आपल्या सहकाऱ्यांना त्वेषाने सूचना देणाऱ्या रोनाल्डोची ती दृश्ये पोर्तुगालच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत. त्यानंतर २०१९ आणि २०२५ मध्ये नेशन्स लीग स्पर्धेत मिळवलेले यशही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पोर्तुगालसारखा संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये काय साध्य करू शकतो, याविषयीच्या जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षा रोनाल्डोने सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवल्या. पदार्पणाच्या २३ वर्षांनंतर आज मागे वळून पाहताना पोर्तुगालच्या फुटबॉल विश्वातील त्याचे स्थान वादातीत आणि अजोड ठरते.

रोनाल्डोचे भावनिक निवेदन :

"आमच्या राष्ट्रीय संघाची सात क्रमांकाची जर्सी परत सोपवण्याची वेळ अखेर आली आहे. ही जर्सी कधी केवळ माझीच होती अशी भावना माझ्या मनात कधीच नव्हती. परंतु सलग २३ वर्षे ही मानाची जर्सी अंगावर चढवण्याचे, तिचे रक्षण करण्याचे आणि जगभरातील भव्य मैदानांवर तिचा सन्मान मिरवण्याचे भाग्य आणि फार मोठी जबाबदारी मला लाभली.

आज ती जर्सी भावी पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते, कारण काही निर्णय केवळ बुद्धीने किंवा तर्काने घेतले जात नाहीत, तर ते मनातून आणि अंतःकरणातून घेतले जातात.

ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झालेला आणि माझे संपूर्ण आयुष्य कायमचे बदलून टाकणारा हा अविस्मरणीय प्रवास आता थांबला आहे. जेव्हा मी राष्ट्रीय संघासोबत घालवलेल्या या संपूर्ण कालखंडाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा मला केवळ सामने, केलेले गोल, रचलेले विक्रम किंवा जिंकलेले चषक दिसत नाहीत.

मला त्यामागे उभी असलेली माणसे दिसतात. मला परदेशात राहणारे ते पोर्तुगीज बांधव दिसतात, जे आमच्या ९० मिनिटांच्या खेळामुळे स्वतःला आपल्या मायभूमीच्या थोडे अधिक जवळ अनुभवत असत. मला असे लाखो पोर्तुगीज नागरिक दिसतात ज्यांना मी प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही, पण तरीही ते नकळत माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले; कारण सरतेशेवटी फुटबॉल हा केवळ एक खेळ नसून त्याहून खूप मोठा आहे. फुटबॉल हा मुळात माणसांशी जोडलेला आहे.

राष्ट्रीय संघासोबतच्या संपूर्ण कारकिर्दीत मी प्रत्येक क्षणी माझ्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडून कठोर परिश्रम केले. मला नेहमी जिंकायचे होते, अधिक उत्तम कामगिरी करायची होती आणि नवा इतिहास लिहायचा होता. मी स्वतःकडून नेहमीच सर्वोच्च दर्जाची अपेक्षा ठेवली. मला नेहमी अधिक हवे होते. आपण याहून अधिक पुढे जाऊ शकतो असा माझा ठाम विश्वास होता आणि या जर्सीच्या सन्मानासाठी माझ्याकडे जे काही सर्वोत्तम होते, ते सर्वस्व मी अर्पण केले.

या प्रवासात अनेक अविस्मरणीय दुपार आणि रात्री आम्ही अनुभवल्या. कधीही विसरता येणार नाहीत असे देदीप्यमान विजय आम्ही साजरे केले, तर काही अशा पराभवांची सलही सोसावी लागली ज्यांच्या आठवणी आजही मनाला वेदना देतात.

माझ्याकडून चुका झाल्या. मी वेदनाही सहन केल्या. पोर्तुगालच्या जनतेला ज्या विजयाची तीव्र प्रतीक्षा होती, ते समाधान मी त्यांना देऊ शकलो नाही असे क्षणही माझ्या वाट्याला आले. परंतु मी कधीही हार मानली नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना मिळणारा अभिमान आणि स्वाभिमान मी कधीही गमावला नाही.

गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मी काही अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकलो: गोल काळाच्या ओघात विस्मरणात जातात, चषक संग्रहालयांची शोभा वाढवतात आणि विक्रमही एक दिवस मोडीत निघतात. परंतु काळाच्या प्रवाहात कधीही नष्ट न होणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे लोकांच्या हृदयात आपण कमावलेले अढळ स्थान. माझ्या खेळामुळे जर तुम्हाला कधी क्षणभराचा आनंद मिळाला असेल, माझ्या एखाद्या गोलमुळे तुम्ही कोणाला आनंदाने मिठी मारली असेल, आपली एखादी विवंचना विसरला असाल किंवा आपल्या देशाचा सार्थ अभिमान बाळगला असेल, तर माझ्या संपूर्ण कष्टांचे चीज झाले असे मी मानतो; कारण पोर्तुगीज असण्याचा खरा अर्थ हाच आहे. आपण एकत्र दुःख सोसतो, एकत्र पुन्हा उभे राहतो आणि नव्या उमेदीने पुन्हा विश्वास ठेवतो.

मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या तरुणांची पोर्तुगालला नेहमीच गरज भासेल. कधीही शरणागती न पत्करणारे खेळाडू आणि जिथे आजवर कोणीही पोहोचू शकले नाही तिथे पोहोचण्याची जिद्द बाळगणारी नवी पिढी या देशाला हवी आहे; कारण नवनवे नायक घडवत राहणारा देशच स्वतःच्या सामर्थ्यावर अखंड विश्वास ठेवू शकतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.