BCCI big decision : भारतीय T20 संघात अचानक बदल! आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय

Team India squad changes : येत्या काही दिवसांत भारतीय संघ रवाना होणार असून, यापूर्वीच जाहीर झालेल्या टी-२० संघात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
BCCI big decision : भारतीय T20 संघात अचानक बदल! आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघात अचानक एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृत घोषणा करत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ या दौऱ्यासाठी रवाना होणार असून, यापूर्वीच जाहीर झालेल्या टी-२० संघात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

आधी आयर्लंडशी दोन हात, त्यानंतर इंग्लंड दौरा

सध्या अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असून नुकत्याच पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ३०० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये १३ जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडसाठी रवाना होईल, जिथे दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. आयर्लंड दौरा आटोपून भारतीय संघ थेट इंग्लंडला पोहोचेल, जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. याच दोन्ही दौऱ्यांवरील टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने संघात बदल केल्याची माहिती दिली आहे.

कार्यभाराच्या व्यवस्थापनासाठी मोहम्मद सिराजला विश्रांती

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेचा भाग नसेल. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या सखोल चर्चेनंतर सिराजच्या 'वर्कलोड मॅनेजमेंट' (कार्यभार व्यवस्थापन) अंतर्गत त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून आणि सिराजला पूर्णपणे ताजेतवाने होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले असून, उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद; १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला सुवर्णसंधी

या आगामी टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे नवे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सुमार फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आल्यामुळे श्रेयस त्याची जागा घेणार आहे, तर युवा फलंदाज तिलक वर्माकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवले गेले आहे. या संघाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता त्याला अंतिम अकरा (प्लेइंग इलेव्हन) खेळाडूंमध्ये पदार्पणाची संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेसाठी सुधारित भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news