

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २७ मार्च १९९४ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. आजपासून ३२ वर्षांपूर्वी ऑकलंडच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एका एकदिवसीय सामन्याने 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला एक अभूतपूर्व वळण दिले. नियमीत सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू यांना मानेच्या दुखापतीमुळे हा सामना खेळता आला नाही आणि ही अनपेक्षित परिस्थिती मास्टर ब्लास्टरसाठी एका नव्या युगाची नांदी ठरली.
तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सचिनला अजय जडेजासह डावाची सुरुवात करण्यास सांगितले आणि हा निर्णय मास्टर ब्लास्टरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरला. या सामन्यापूर्वी ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनच्या खात्यात ३०.८४ च्या सरासरीने १७५८ धावा जमा होत्या. मात्र, सलामीवीर म्हणून मिळालेल्या या संधीचे सचिनने सोने केले. त्याने किवी गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ४९ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८२ धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीदरम्यान सचिनचा स्ट्राईक रेट १६७.३५ राहिला.
न्यूझीलंडने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सचिनच्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर २४ व्या षटकातच ७ गडी राखून विजय साकारला. या सामन्यातील संस्मरणीय खेळीसाठी सचिनला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीराचा उदय याच दिवसापासून झाला.
या सामन्यानंतर सचिनने ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून धुरा सांभाळली आणि ४८.२९ च्या सरस सरासरीने १५,३१० धावा कुटल्या. त्याच्या एकूण ४९ एकदिवसीय शतके आणि ७५ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने ४५ शतके ही सलामीला येत झळकावली आहेत.
३२ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात तितकाच ताजा आहे.
सचिन तेंडुलकरच्या एकूण एकदिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास, त्याच्या नावावर ४६३ सामन्यांत १८,४२६ धावांचा विश्वविक्रम आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा (१४,२३४ धावा) सचिनपेक्षा बराच मागे आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या जोडीने सलामीवीर म्हणून आपले नाव अजरामर केले आहे. १९९६ ते २००७ या प्रदीर्घ काळात या दिग्गज जोडीने १३६ डावांमध्ये ४९.३२ च्या सरासरीने ६,६०९ धावांची उत्तुंग भागीदारी केली. यात २१ शतकी आणि २३ अर्धशतकी भागीदारींचा समावेश असून, २५८ धावा ही त्यांची सर्वोच्च भागीदारी राहिली आहे. या जोडीनंतर ऑस्ट्रेलियाचे ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन (५,३७२ धावा) या जोडीचा क्रमांक लागतो, मात्र सचिन-सौरवच्या जोडीने प्रस्थापित केलेले मानदंड आजही अभेद्य आहेत.