

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याला भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान झालेली दुखापत गंभीर असून, वर्षाअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेतून तो बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या महत्त्वाच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी वोक्स एक मोठी जोखीम घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याला ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. इतकेच नव्हे, तर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अखेरच्या क्षणी तो एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याची ही दुखापत पाहता, अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी वोक्स ॲशेस मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, या सर्व चर्चांवर स्वतः वोक्सनेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वोक्सने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ॲशेस मालिकेसाठी वेळेत तंदुरुस्त होण्याकरिता तो खांद्याच्या शस्त्रक्रियेऐवजी ‘पुनर्वसन’ (Rehabilitation) प्रक्रियेचा पर्याय निवडू शकतो. वोक्सच्या दुखापतीचे स्कॅनिंग झाले असून, तो अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. तथापि, आठ आठवड्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेद्वारे ॲशेस मालिकेपूर्वी तंदुरुस्त होऊ शकेन, असा विश्वास त्याला वाटतो. मात्र, याबाबत त्याने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
बीबीसी स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत ख्रिस वोक्स म्हणाला, ‘‘दुखापत किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी मी थांबलो आहे, परंतु माझ्यासमोर शस्त्रक्रिया किंवा 'पुनर्वसन' हे दोन पर्याय असू शकतात असे मला वाटते. ही दुखापत मला भविष्यात पुन्हा त्रास देऊ शकते याची मला कल्पना आहे, पण मला वाटते की ही एक अशी जोखीम आहे, जी पत्करण्यास मी तयार आहे.’’
वोक्स पुढे म्हणाला, ‘‘मी फिजिओ आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. साहजिकच, ॲशेस आणि ऑस्ट्रेलिया मालिकेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण आहे. पुनर्वसन प्रक्रियेसाठी आठ आठवड्यांचा कालावधी लागेल, त्यामुळे हा एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मी स्कॅनचा अहवाल आल्यानंतरच घेईन.’’