LSG vs CSK | चेन्नईचे प्ले-ऑफचे गणित बिघडले!

लखनौचा 7 गडी राखून विजय; मिचेल मार्शची 90 धावांची स्फोटक खेळी
LSG vs CSK | चेन्नईचे प्ले-ऑफचे गणित बिघडले!
Published on
Updated on

लखनौ; वृत्तसंस्था : आयपीएल 2026 मधील प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) लखनौ सुपर जायंटस्कडून (एलएसजी) 7 गडी राखून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिलेले 188 धावांचे लक्ष्य लखनौने अवघ्या 16.4 ओव्हर्समध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. त्यांच्या मिचेल मार्शने अवघ्या 38 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 90 धावांची स्फोटक खेळी केली. तर मध्यमगती गोलंदाज आकाश सिंगने भेदक मारा करत 26 धावांत 3 गडी बाद केले. दरम्यान, या पराभवामुळे चेन्नईच्या प्ले-ऑफच्या अडचणी वाढल्या आहेत.

कार्तिक शर्मा आणि दुबेची फटकेबाजी

या लढतीत लखनौने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड (13) आणि संजू सॅमसन (20) स्वस्तात बाद झाले. या दोघांना आकाश सिंगने तंबूत धाडले. त्यानंतर 2 बाद 36 वरून चेन्नईच्या 52 धावा झाल्या असताना उर्विल पटेल 6 धावांवर आकाश सिंगची शिकार बनला. त्यानंतर कार्तिक शर्माने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत संघाचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. कार्तिकने 42 चेंडूंत 71 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. शहाबाज अहमदने कर्तिकला बाद केले. डेवाल्ड बे्रवीसने 16 चेंडूंत 2 षटकारांसह 25 धावांची जलद खेळी केली. शिवम दुबेने 16 चेंडूंत नाबाद 32 धावांची धडाकेबाज खेळी करत प्रशांत वीरच्या (नाबाद 13) मदतीने चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 187 धावांपर्यंत पोहोचवले. लखनौकडून आकाश सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत 26 धावांत 3 बळी घेतले.

मार्शचे वादळ आणि पुरनची फिनिशिंग

188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. सलामीवीर मिचेल मार्शने चौफेर टोलेबाजी करत अवघ्या 38 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 90 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने अवघ्या 21 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्याला जोस इंग्लिसने (36) चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी करत लखनौचा विजय सोपा केला. मुकेश चौधरीच्या फेकीवर मार्श धावबाद झाला. त्याचे शतक दहा धावांनी हुकले.

17 व्या षटकात पूरनचे सलग 4 षटकार

अखेर निकोलस पुरनने 17 चेंडूंत नाबाद 32 धावा करत 20 चेंडू राखून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने एक चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. डावातील 17 व्या षटकांत अन्शुल कांबोजच्या पहिल्या 4 चेंडूवर चारही षटकार मारत सामना संपविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news