

चेन्नई; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबादने ‘आयपीएल 2025’मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईवर 5 विकेटस् आणि 8 चेंडू शिल्लक ठेवत विजयाची नोंद केली. ‘आयपीएल’च्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हैदराबादने चेन्नईचा चेपॉकवर पराभव केला आहे. फॉर्मात नसलेल्या नितीश रेड्डीने आणि कामिंदू मेंडिसने अखेरच्या षटकांमध्ये संघाला विजयापर्यंत नेले. (CSK vs SRH)
या सामन्यात चेन्नईने हैदराबाद समोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग हैदराबादने 18.4 षटकांत 5 विकेटस् गमावत पूर्ण केला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहोचला आहे, तर सातव्या पराभवामुळे आधीच तळात असलेल्या ‘सीएसके’ संघाची वाट बिकट झाली असून, त्यांचे पॅकअप झाल्यातच जमा आहे.
‘सीएसके’च्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे सलामीला फलंदाजीला उतरले होते; पण दुसर्याच चेंडूवर खलील अहमदने अभिषेक शर्माला आयुष म्हात्रेच्या हातून झेलबाद केले. नंतर हेडला इशान किशन साथ देत होता. परंतु, सहाव्या षटकात अंशुल कंबोजने हेडला 19 धावांवर त्रिफळाचीत केले. 9 व्या षटकात क्लासेनचा अडथळा रवींद्र जडेजाने दूर केला. तो 7 धावांवर बाद झाला. मधल्या षटकांमध्ये जडेजाने चांगली गोलंदाजी केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी फार धावाही दिल्या नव्हत्या. तरी इशान किशनला अनिकेत वर्माने साथ दिली; पण अखेर 12 व्या षटकात इशान किशनचा शानदार झेल बाऊंड्री लाईनजवळ सॅम कुरेनने घेतला. इशान किशनने 34 चेंडूंत 44 धावा केल्या. 14 व्या षटकात अनिकेत वर्माही 19 धावांवर नूर अहमदविरुद्ध खेळताना दीपक हुडाच्या हातून झेलबाद झाला; पण नंतर नितीश कुमार रेड्डी आणि कामिंदू मेंडिस यांनी डाव सावरला. त्यांनी संयमी खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. कामिंदू मेंडिस 22 चेंडूंत 32 धावांवर नाबाद राहिला. नितीश कुमार रेड्डीने नाबाद 19 धावा केल्या. (CSK vs SRH)
चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक 2 विकेटस् घेतल्या. खलील अहमद, अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजीसाठी उतरले. चेन्नईचा संघ 19.5 षटकांतच 154 धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईकडून डेवॉल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. आयुष म्हात्रेने 30 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा (21), दीपक हुडा (22) आणि शिवम दुबे (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या. पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. मोहम्मद शमी आणि कामिंदू मेंडिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.