Australian Open : अल्काराझची ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या फायनलमध्ये मुसंडी! ५ तास २७ मिनिटांच्या ‘उपांत्य’ लढतीत झ्वेरेव्हला लोळवले

Carlos Alcaraz : पायाचे स्नायू दुखावले असतानाही लंगडत-लंगडत विजयाला गवसणी घातली
Australian Open : अल्काराझची ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या फायनलमध्ये मुसंडी! ५ तास २७ मिनिटांच्या ‘उपांत्य’ लढतीत झ्वेरेव्हला लोळवले
Published on
Updated on

मेलबर्न : टेनिस जगतातील नवा सुपरस्टार कार्लोस अल्काराझने शुक्रवारी (दि. ३०) मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अशा उपांत्य फेरीत, पायाचे स्नायू दुखावले असतानाही लंगडत-लंगडत निव्वळ जिद्दीच्या जोरावर अल्काराझने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. ५ तास २७ मिनिटे चाललेल्या या 'मॅरेथॉन' लढतीत विजय मिळवत स्पॅनिश खेळाडूने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

पाच सेटचा श्वास रोखून धरणारा थरार

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अल्काराझने सुरुवातीचे दोन सेट ६-४, ७-६ ने जिंकून सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये सामन्याला वेगळेच वळण मिळाले. अलकाराझच्या 'क्रॅम्प्स' येऊ लागले आणि तो वेदनेने व्याकुळ झाला. झ्वेरेव्हने या संधीचा फायदा घेत पुढचे दोन सेट टायब्रेकरमध्ये (६-७, ६-७) जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.

निर्णायक पाचव्या सेटमध्ये अल्काराझ अक्षरशः लंगडत खेळत होता, पण त्याच्या मनातील जिंकण्याची ऊर्मी कमी झाली नव्हती. त्याने शेवटच्या सेटमध्ये झ्वेरेव्हची सर्व्हिस मोडीत काढत ७-५ असा विजय मिळवला आणि त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

मैदानावर वादाची ठिणगी

सामन्यादरम्यान तिसऱ्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी असताना वाद पाहायला मिळाला. अल्काराझला दुखापतीतून सावरण्यासाठी पंचांनी जादा वेळ दिला, ज्यावर झ्वेरेव्हने तीव्र संताप व्यक्त केला. नेटवरील पंच मारियाना वेल्जोविक यांच्याशी वाद घालताना झ्वेरेव्हचा संयम सुटला आणि त्याने अपशब्दांचा वापर करत आपला राग व्यक्त केला.

सामन्यातील विक्रम

  • सर्वात मोठी सेमीफायनल : ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात जास्त काळ चाललेली उपांत्य फेरी ठरली.

  • करिअर ग्रँड स्लॅमच्या उंबरठ्यावर : अवघ्या २२ व्या वर्षी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा अल्काराझ हा ‘ओपन एरा’मधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

  • तिसरा प्रदीर्घ सामना : मेलबर्न पार्कच्या इतिहासातील २०१२ ची फायनल आणि २०२३ मधील अँडी मरे विरुद्ध कोकिनाकिस यांच्यातील सामन्यानंतरचा हा तिसरा सर्वात मोठा सामना ठरला.

‘स्वतःवर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तिसऱ्या सेटमध्ये मी शारीरिकदृष्ट्या खूप संघर्ष करत होतो. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वात कठीण सामना होता.’

कार्लोस अल्काराझ

रविवारी कोणाशी होणार झुंज?

आता संपूर्ण जगाचे लक्ष रविवारच्या महाअंतिम फेरीकडे लागले आहे. सातवे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी अल्काराझची सज्ज झाला आहे. अंतिम सामन्यात त्याची लढत नोव्हाक जोकोविच विरुद्ध यानिक सिनर यांच्यातील विजेत्याशी होईल. जर अल्काराझने रविवारी बाजी मारली, तर तो राफेल नदालचा विक्रम मोडीत काढून 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news