

WWE Champion Brock Lesnar Retirement : : "कुस्तीच्या रिंगणातील आणि इतर सर्व गोष्टींमधील माझा प्रवास इथेच संपत आहे," अशा शब्दांमध्ये तब्बल १० वेळा WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरने मंगळवारी (दि. ४) 'द पॅट मॅकएफी शो'मध्ये व्यावसायिक कुस्तीसह सर्व प्रकारच्या खेळांमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली. शनिवारी मिनियापोलिस येथे पार पडलेली WWE ची 'समरस्लॅम' ही आपल्या कारकिर्दीतील अंतिम लढत होती, असेही त्याने स्पष्ट केले.
निवृत्तीची घोषणा करताना भावूक झालेला लेसनर म्हणाला, या वर्षीच्या 'रेसलमेनिया'मध्ये ओबा फेमीविरुद्धच्या सामन्यानंतर रिंगमध्ये बूट आणि हातमोजे काढून मी निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र, चाहत्यांच्या आग्रहाखातर 'हेल इन अ सेल' (Hell in a Cell) सामन्यात शेवटचा सहभाग नोंदवला. शनिवारचा दिवस माझ्यासाठी खूप भावूक होता. रेसलमेनियामध्ये जेव्हा ओबा फेमीने मला रिंगमध्ये आदळले, तेव्हाच मला वाटले होते की आता बस... मी पुढे खेळू शकत नाही. पण माझ्यात अजून थोडी ऊर्जा शिल्लक होती. मात्र, आता शनिवारी 'द स्क्वेअर सर्कल' (रिंग) आणि क्रीडा विश्वाला मी पूर्णपणे निरोप दिला आहे."
दक्षिण डकोटातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला ब्रॉक लेसनरने क्रीडा जगतात अभूतपूर्व यश संपादन केले. २००० मध्ये मिनेसोटा विद्यापीठासाठी खेळताना त्याने NCAA डिव्हिजन १ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद पटकावले होते.
२००२ मध्ये WWE मध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच वर्षी आपल्या प्रसिद्ध 'F-5' मूव्हच्या जोरावर ड्वेन 'द रॉक' जॉन्सनचा पराभव करत त्याने पहिल्यांदा चॅम्पियनशिप बेल्ट पटकावला.कारकिर्दीत १० वेळा WWE वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या लेसनरने २ रॉयल रंबल (२००३, २०२२), किंग ऑफ द रिंग (२००२) आणि मनी इन द बँक (२०१९) या स्पर्धांवर आपले नाव कोरले.
२०१४ च्या रेसलमेनियामध्ये 'द अंडरटेकर'ची सलग २१ सामन्यांची ऐतिहासिक विजयमालिका (21-0 Streak) मोडून लेसनरने संपूर्ण जगाला थक्क केले होते. दरम्यान, २००४ मध्ये कुस्तीला काही काळ पूर्णविराम देत त्याने अमेरिकन फुटबॉल लीग (NFL) मध्ये मिनेसोटा व्हायकिंग्स संघाकडून प्री-सीझन सामने खेळले.
२००७ मध्ये त्याने मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये प्रवेश केला. २००८ मध्ये अवघ्या चौथ्या सामन्यात रँडी कुचरचा पराभव करत त्याने UFC हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. २०१५ मध्ये एमएमए मधून निवृत्त झाल्यावर, २०१६ च्या UFC 200 मध्ये तो पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरला होता.
लेसनर म्हणाला, मी लहान मुलांना हेच सांगू इच्छितो की, "मी सुद्धा शेतावर वाढलेलो एक सामान्य मुलगा होतो, ज्याच्या खिशात फक्त कपड्यांचे धागे-दोरे असायचे. माझ्या मनात मोठी स्वप्ने होती आणि मी फक्त कठोर परिश्रम केले.४९ व्या वर्षी या टप्प्यावर पोहोचलो याचा मला सार्थ अभिमान आहे. मला वाटते की, सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंना विविध गोष्टी करताना पाहणारे अनेक लोक त्यामागील कठोर परिश्रमांकडे दुर्लक्ष करतात. जर लहान मुलांनी कठोर परिश्रम आणि सरावावर लक्ष केंद्रित केले, तर त्यांना यश नक्कीच मिळेल."