

India vs Bangladesh cricket : मागील वर्षभरापासून बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांना मोठा तडा गेला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रस्तावित बांगलादेश दौऱ्याबाबत स्पष्टता आणि मंजुरी मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच भारत सरकारशी संपर्क साधणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
आयपीएल २०२६ (IPL 2026) मधून कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळल्यानंतर बांगलादेशने प्रत्युत्तर म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय या दौऱ्याबाबत स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यासाठी ते सरकारचे मार्गदर्शन घेणार आहेत.
बीसीसीआयच्या सूत्रा नुसार, "आम्ही यावर काम करत असून बांगलादेश दौऱ्याबाबत सरकारकडे परवानगी आणि स्पष्टता मागणार आहोत. या टप्प्यावर आम्ही स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, पण लवकरच आम्ही सरकारशी संपर्क साधू."
रिपोर्टनुसार, या प्रस्तावित दौऱ्याच्या भविष्याबाबत बीसीसीआय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) सतत संपर्कात आहे. बीसीबीने बीसीसीआयला पत्र लिहिले असून, २९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर यादरम्यान या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेळ (विंडो) राखून ठेवली आहे.
भारतीय संघ सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. यानंतर २४ सप्टेंबरपासून जपानमध्ये सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघ सहभागी होणार आहे.भारताने यापूर्वी २०२२ मध्ये बांगलादेशचा शेवटचा दौरा केला होता, ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले गेले होते. त्यात बांगलादेशने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती, तर भारताने कसोटी मालिकेत २-० असा व्हाईटवॉश दिला होता.