

जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमावर केलेली एक वादग्रस्त टिप्पणी गाजली होती. आता प्रदीर्घ काळानंतर बावुमाने या प्रकरणावर आपली मौन सोडले आहे.
Temba Bavuma on bouna comment
जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नुकतीच पार पडलेली क्रिकेट मालिका केवळ खेळासाठीच नाही, तर मैदानाबाहेरील वादांमुळेही चर्चेत राहिली. या दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमावर केलेली एक वादग्रस्त टिप्पणी गाजली होती. आता प्रदीर्घ काळानंतर बावुमाने या प्रकरणावर आपली मौन सोडले असून, त्या कटू आठवणींना उजाळा दिला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान हा प्रकार घडला होता. बुमराहने 'एलबीडब्ल्यू' (LBW) अपील केले. यावेळी त्याने बावुमाचा उल्लेख 'बौना' (बुटका) असा केला होता. ही टिप्पणी स्टंप माईकमध्ये स्पष्टपणे कैद झाली आणि सोशल मीडियावर त्यावरून वादाला तोंड फुटले. त्यावेळी बावुमाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.
'ईएसपीएन क्रिकइन्फो'मधील आपल्या स्तंभात बावुमाने या घटनेचा सविस्तर खुलासा केला आहे. त्याने लिहिलं आहे की, "त्या दिवशी नक्की काय घडले होते, हे मला ठाऊक आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत माझ्याबद्दल काही शब्द वापरले होते. दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह माझ्याकडे आले. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली. खरं तर, जेव्हा त्यांनी माफी मागितली, तेव्हा मला त्या घटनेची कल्पनाही नव्हती. नंतर मी आमच्या मीडिया मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर मला सर्व प्रकार समजला."
बावुमाने असेही स्पष्ट केले की, "माझं असं मत आहे की, मैदानावर जे घडतं ते तिथेच राहायला हवं. मात्र, तुमच्याबद्दल काय बोलले गेले आहे, हे तुम्ही विसरू शकत नाही. तुम्ही त्याचा वापर स्वतःसाठी एक प्रेरणा म्हणून करू शकता."
केवळ भारतीय खेळाडूच नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनीही भारतीय संघाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली होती. यावर भाष्य करताना बावुमा म्हणाला, "जेव्हा मी प्रशिक्षकांचे ते विधान ऐकले, तेव्हा मलाही ते आवडले नव्हते. त्यांनी अधिक चांगल्या शब्दांचा वापर करायला हवा होता. मात्र, ही कसोटी मालिका किती आव्हानात्मक होती, याचीच ती जाणीव होती. नंतर त्यांनी वनडे मालिकेदरम्यान या विषयावर चर्चा करून वादावर पडदा टाकला."