

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करूनच आम्ही भारताला भारतात मात देण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने व्यक्त केला. डेव्हिड मिलरचा गेलेला फॉर्म या स्पर्धेत परत आला आहे. आता तोच आमचे मुख्य अस्त्र असेल, असेही बवुमा म्हणाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी – 20 मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीत होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. आपापल्या भारतीय खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळणारे हे आफ्रिकी खेळाडू आता त्यांच्याविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
आयपीएलमध्ये खेळणारे डेव्हिड मिलर, क्विंटन डिकॉक, एडिन माक्ररम, मार्को जनसेन, कसिगो रबाडा हे प्रमुख दक्षिण आफ्रिकी खेळाडू भारताविरुद्धच्या टी – 20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. याचबरोबर काही युवा खेळाडू देखील आयपीएलमध्ये खेळले आहेत. या सर्वांबद्दल कर्णधार टेम्बा बवुमाने काही वक्तव्य केले आहेत. विशेषकरून डेव्हिड मिलरबद्दल त्याने एक तास वक्तव्य केले.
बवुमा डेव्हिड मिलरच्या प्रमोशनबद्दलही बोलला. तो म्हणाला, 'आम्ही डेव्हिड मिलरला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन देण्याबाबत देखील चर्चा करतोय. तो जितके जास्त बॉल खेळेल तितका तो धोकादायक बनत जाईल. त्याला त्याची संघातील जागा, त्याची भूमिका माहिती आहे. मात्र ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याला सामन्यातील जास्तीजास्त चेंडू खेळण्याची संधी देण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.'
याचबरोबर टेम्बा बवुमाने इतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. 'आयपीएलमध्ये संघातील काही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, हे पासून चांगले वाटते.
कसिगो रबाडा आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. क्विंटन डिकॉकने देखील आपला क्लास दाखवून दिला आहे. मर्को जेनसेन एडिन माक्ररम आणि इतर युवा खेळाडूंनी देखील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.' बवुमाने या सर्व गोष्टी संघाच्या द़ृष्टिकोनातून चांगल्या असल्याचे सांगितले.