

World Athletics U20 Championships : भारताचा १९ वर्षीय उंच वडीपटू (हाय जंपर) बसंत कुमार मेघवाल (Basant Kumar Meghwal) याने शनिवारी येथे सुरू असलेल्या 'वर्ल्ड ॲथलेटिक्स यु-२० चॅम्पियनशिप'मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुष गटातील उंच वडीच्या प्रकारात बसंतने २.२१ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या इतिहासात उंच उडी या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथील रहिवासी असलेल्या बसंतने भारताला चालू स्पर्धेतील दुसरे पदक मिळवून दिले. पदकाच्या शर्यतीत अंतिम क्षणापर्यंत चुरस पाहायला मिळाली. तिन्ही पदकविजेत्या खेळाडूंनी २.२१ मीटरची उंची पार केली, मात्र २.२४ मीटरचा टप्पा ओलांडण्यात तिघेही अपयशी ठरले. प्रत्येकी तीन प्रयत्नांनंतरही ही उंची पार न झाल्याने, विजेत्यांचा निर्णय आधीच्या प्रयत्नांच्या (काऊंटबॅक) आधारे घेण्यात आला.
अल्जेरियाच्या युनेस अयाचीने पहिल्याच प्रयत्नात २.२१ मीटरची उडी मारून सुवर्णपदक पटकावले. बसंतने दुसऱ्या प्रयत्नात ही उंची गाठत रौप्यपदक निश्चित केले. तर ग्रेट ब्रिटनच्या ओटिस पूलला हीच उंची गाठण्यासाठी तीन प्रयत्न लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
बसंतसाठी हा हंगाम अत्यंत चमकदार राहिला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने आपली छाप पाडली आहे. २.२१ मीटरची कामगिरी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी याच वर्षी त्याने 'आशियाई यु-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीने बसंतने भारतीय ॲथलेटिक्समधील उगवता तारा असल्याचे सिद्ध केले आहे.
बसंतच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताची या स्पर्धेतील पदकसंख्या दोनवर पोहोचली आहे. याआधी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आशिष यादवने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकून भारताचे पदकांचे खाते उघडले होते.