

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र देशांतर्गंत सुरु असेलेल्या एका चषकामध्ये विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये एक विश्वविक्रम घडला आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा विरुद्ध सिक्कीम सामन्यामध्ये बडोदा संघाने 20 षटकांत 37 षटकार ठोकले. या जोरावर बडोदा संघाने 20 षटकांत सर्वात मोठी 349 धावांची मजल मारत नवा विक्रम आपल्या नावावर केला. दरम्यान, झिम्बाब्वे मागील महिन्यात टी-20 सामन्यात गॅम्बियाविरुद्ध 344 धावा केल्या होत्या.
सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बडोदा आणि सिक्कीम यांच्यात सामना झाला. यामध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बडोद्याच्या फलंदाजांनी सिक्कीमच्या गोलंदाजांचा चांगलाच पाहुणचार केला. बडोद्यासाठी सलामीवीर अभिमन्यू सिंगने 17 चेंडूंत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या भानू पानियाने 51 चेंडूंत 5 चौकार आणि 15 षटकारांसह नाबाद 134 धावांची खेळी केली.
भानू आणि अभिमन्यू सोबतच शिवालिक शर्माने 17 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह 55 धावा केल्या तर विष्णू सोलंकीनेही 16 चेंडूत 6 षटकारांसह 50 धावा केल्या. बडोदा संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 349 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टी-20 फॉर्मेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. बडोद्याच्या फलंदाजांनी या डावात एकूण 37 षटकार ठोकले. त्यामुळे एका टी-20 सामन्याच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमही बडोदा संघाने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेने गांबियाविरुद्ध एका डावात 27 षटकार मारले होते. याच बरोबर एकाच सामन्यात तीन पेक्षा जास्त फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.