

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 235 धावांवर आटोपला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवींद्र जडेजाने 5 तर वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या.
न्यूझीलंडच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने पहिल्या डावात सावध पवित्रा घेतला. मात्र पुन्हा एकदा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने निराशा केली. 7व्या षटकात मॅट हेन्रीने बाद केल्यानंतर रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने केवळ 18 धावांचे योगदान दिले. रोहित बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालही 30 धावा करून बाद झाला. जैस्वालची विकेट गेल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरल. लागोपाठ दोन फलंदाज बाद झाल्यामुळे भारतीय संघावरील दडपण कमी करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पण तोही केवळ 4 धावा करून तंबूत परतला.
एकेरी चोरी करण्याचा प्रयत्न करताना कोहली धावबाद झाला. कोहलीने केवळ 4 धावा केल्या. पण यासह त्याने 2 मोठे विक्रम आपल्या नावावर केले. खरे तर कोहली मैदानावर येताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 डाव पूर्ण केले. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 डाव खेळणारा पहिला सक्रिय क्रिकेटपटू बनला आहे.
600 डाव : विराट कोहली
518 डाव : मुश्फिकुर रहीम
518 डाव : रोहित शर्मा
491 डाव : शाकिब अल हसन
470 डाव : अँजेलो मॅथ्यूज
600 आंतरराष्ट्रीय डाव खेळण्याचा विक्रम करणारा कोहली हा केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी ही मोठी कामगिरी केली होती. एवढेच नाही तर हा टप्पा गाठणारा तो जगातील आठवा क्रिकेटपटू ठरला आहे.
सचिन तेंडुलकर : 782
राहुल द्रविड : 605
विराट कोहली : 600
एमएस धोनी : 526
रोहित शर्मा : 518
कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. यापूर्वी 600 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. कोहली हा जगातील पहिला फलंदाज आहे ज्याने 600 डावांनंतर 27 हजारांहून अधिक धावा करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.
27133 धावा : विराट कोहली*
26020 : सचिन तेंडुलकर
25386 : रिकी पाँटिंग
25212 : जॅक कॅलिस
24884 : कुमार संगकारा
24097 : राहुल द्रविड
21815 : महेला जयवर्धने
19917 : सनथ जयसूर्या