

पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root Record : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला. तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. याबाबतीत रूटने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकून नवा विश्वविक्रम नोंदवला.
इंग्लंडने क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह इंग्लिश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जो रूट पहिल्या डावात खाते न उघडता तंबूत परतला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने 15 चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी केली. या छोट्या खेळीच्या जोरावर रूटने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. तो कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक 1630 धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (1625 धावा) नावावर होता.
गेल्या काही महिन्यांपासून जवळपास प्रत्येक सामन्यात काही ना काही विश्वविक्रम मोडत आहे. विशेषतः त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने सचिनचा आणखी एक विक्रमही मोडला. रविवारी 1 डिसेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध 104 धावांचा पाठलाग करताना रुटने 15 चेंडूत 23 धावांची शानदार खेळी केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन कामगिरी नोंदवली.
जो रूट : 1630 धावा
सचिन तेंडुलकर : 1625 धावा
ॲलिस्टर कुक : 1611 धावा
ग्रॅम स्मिथ : 1611 धावा
शिवनारायण चंद्रपॉल : 1580 धावा
कोणत्याही कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करणे सामान्यतः कठीण मानले जाते. मात्र, रूटने या बाबतीतही सातत्य दाखवले आहे. त्याने आतापर्यंत 49 वेळा चौथ्या डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान, त्याने 41.79 च्या प्रभावी सरासरीने 1,630 धावा केल्या. यात 141* धावांच्या सर्वोच्च धावसंख्येसह 2 शतके आणि 8 अर्धशतके फटकावली आहेत. तेंडुलकरने चौथ्या डावात 60 वेळा फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये त्याने 36.93 च्या सरासरीने 1,625 धावा केल्या. त्याचवेळी, ॲलिस्टर कूकने चौथ्या डावात 53 वेळा फलंदाजी करत 35.80 च्या सरासरीने 1,611 धावा केल्या आहेत. ग्रॅम स्मिथ (1,611) आणि शिवनारायण चंद्रपॉल (1,580) या यादीत आहेत.
जो रूटच्या केवळ 620 धावा इंग्लंडच्या विजयादरम्यान उपयुक्त ठरल्या आहेत. तर तेंडुलकरसाठी हा आकडा 715 आहे. केवळ द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथनेच संघाच्या विजयादरम्यान, चौथ्या डावात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत रुट (12,777) आणि तेंडुलकर (15,921) यांच्यात केवळ 3,144 धावांचा फरक आहे.
तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून पहिल्या डावात पदार्पण करणाऱ्या नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर जो रूट चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. यामुळे स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतर 150 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला.