

निंगबो (चीन); वृत्तसंस्था : येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या आयुष शेट्टीने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. आयुषने उपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतीत थायलंडच्या वर्ल्ड नंबर 1 आणि गतविजेत्या कुनलावत वितिदसर्नचा 10-21, 21-19, 21-17 असा पराभव केला.
पहिल्या गेममधील पिछाडीनंतर पुनरागमन
पॅरिस ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता आणि 2023 चा जागतिक चॅम्पियन असलेल्या वितिदसर्नविरुद्ध आयुषची सुरुवात कठीण झाली. पहिला गेम त्याने 10-21 असा गमावला. मात्र, हार न मानता आयुषने दुसर्या गेममध्ये 11-4 अशी भक्कम आघाडी घेतली. वितिदसर्नने गुणसंख्या 13-11 पर्यंत जवळ आणली होती, पण आयुषने आपला संयम ढळू दिला नाही आणि सामना तिसर्या गेममध्ये नेला. 1 तास 15 मिनिटे चाललेल्या या लढतीत आयुषने तिसर्या गेममध्येही अभेद्य बचाव कायम राखत फायनल गाठली.
61 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती!
1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर आशियाई चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा आयुष हा केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.