

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील रोमांचक टी-२० मालिकेच्या निर्णायक टप्प्यात टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. सध्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) उर्वरित दोन टी-२० सामन्यांमधून बाहेर झाला आहे. तो आजारी असल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) ही माहिती दिली आहे.
अक्षर पटेलची तब्येत बिघडल्यामुळे तो धर्मशाला येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यातही खेळू शकला नव्हता. बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आजारपणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे उर्वरित दोन टी-२० सामने खेळू शकणार नाही. तो सध्या लखनऊमध्ये संघासोबत असून त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातील,’ असे कळवण्यात आले आहे.
अक्षर पटेलच्या या बाहेर पडण्याने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीम मॅनेजमेंटला संघात बदल करावे लागणार आहेत. या अनपेक्षित बदलामुळे टीम इंडियाची पुढील रणनीती काय असेल, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अक्षर पटेल बाहेर झाल्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने तात्काळ त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघात समावेश केला आहे. शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) या अष्टपैलू खेळाडूला उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी (लखनऊ आणि अहमदाबाद) संघात स्थान देण्यात आले आहे. शाहबाजची ही दोन वर्षांनंतर टीम इंडियात झालेली 'अचानक एन्ट्री' आहे. त्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
दक्षिण आफ्रिका मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्याने महत्त्वाचे योगदान दिले होते. कटक येथील सामन्यात अक्षरने शानदार गोलंदाजी करत ७ धावांत २ बळी घेतले होते आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर न्यू चंदीगडमधील सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, पण केवळ २१ धावा करू शकला होता.
अक्षर पटेलची जागा घेणारा शाहबाज अहमद हा मूळचा बंगालचा आहे. त्याने भारतासाठी ३ वनडे आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने २०२२ मध्ये पदार्पण केले होते. तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) सारख्या संघांसाठी खेळला आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद.