

australia vs south africa 3rd odi travis head and mitchell marsh record
द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्या जोडीने एक नवा इतिहास रचला आहे. या दोन्ही खेळाडूंनी द. आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचे विक्रम सोलंकी आणि मार्कस ट्रेस्कोथिक यांच्या नावावर होता.
तिसऱ्या वनडे सामन्यात मार्श आणि हेड यांच्यात पहिल्या गड्यासाठी २५० धावांची भागीदारी झाली. ही द. आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. यापूर्वी, २००३ साली इंग्लंडचे विक्रम सोलंकी आणि मार्कस ट्रेस्कोथिक यांनी २०० धावांची भागीदारी केली होती. त्याआधी २००१ मध्ये भारताचे सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्यात १९३ धावांची भागीदारी झाली होती.
२५०* : ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया), मकाय २०२५
२०० : विक्रम सोलंकी आणि मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड), द ओव्हल २००३
१९३ : सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (भारत), जोहान्सबर्ग २००१
१९३ : शिवनारायण चंद्रपॉल आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडिज), जोहान्सबर्ग २००४
यासोबतच, या दोन्ही खेळाडूंनी आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही पाचवी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी २५० किंवा त्याहून अधिक धावांची सलामी भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यांतील सर्वात मोठी सलामी भागीदारी २८४ धावांची आहे. २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी हा विक्रम केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात २६९ धावांची सलामी भागीदारी झाली होती.
२८४ धावा : ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर : पाकिस्तान, ॲडलेड २०१७
२६९ धावा : ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर : इंग्लंड मेलबर्न २०२२
२५९ धावा : मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर : पाकिस्तान, बंगळूर २०२२
नाबाद २५८* धावा : ॲरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर : भारत, वानखेडे २०२०
२५० धावा : ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श : द. आफ्रिका, मकाय २०२५*
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करण्याची ही आठवी वेळ आहे, जेव्हा एकाच सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी केली आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने १०३ चेंडूंत १७ चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने १४२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, मिचेल मार्शने सहा चौकार आणि पाच षटकारांसह १०० धावा करून तंबूत परतला.