

Australia Knocked Out of T20 World Cup 2026 Zimbabwe qualify Super 8
पल्लेकेले : निसर्गाचा लहरीपणा कधी कोणाचे नशीब उजळवेल आणि कोणाचे स्वप्न धुळीस मिळवेल, याचा नेम नसतो. आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील साखळी फेरीच्या निर्णायक सामन्यात आज नियतीने अशीच काहीशी खेळी खेळली. पावसाच्या संततधारेमुळे हा सामना एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करावा लागला. सामना 'रद्द'ची घोषणा होताच झिम्बाब्वेसाठी सुपर-8 फेरीचे दरवाजे उघडले, तर तब्बल १७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर 'गट फेरी'तच आपला गाशा गुंडाळून घर गाठण्याची नामुष्की ओढवली आहे.
मैदानावर बॅट आणि बॉलचा संघर्ष पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला खरा, पण झिम्बाब्वेच्या गोटात मात्र आनंदाला उधाण आले आहे. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना समसमान एक गुण बहाल करण्यात आला. याच एका मौल्यवान गुणाच्या जोरावर झिम्बाब्वेने गुणतालिकेत झेप घेत 'सुपर-८' फेरीचे तिकीट पक्के केले. झिम्बाब्वेच्या संघाने या स्पर्धेत दाखवलेली जिद्द आज निसर्गाच्या साक्षीने फळाला आली.
या निकालाचा सर्वात मोठा तडाखा बसला तो म्हणजे सहावेळा विश्वविजेतेपद भूषवणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला. कांगारूंना या स्पर्धेतून अनपेक्षितपणे बाहेर पडावे लागले आहे. ज्यांच्या नावाचा दरारा क्रिकेट जगतात घुमत असतो, त्या ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागल्याने क्रिकेट तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. मैदानाबाहेर बसून आपल्या नशिबाचा कौल पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पदरी अखेर निराशाच पडली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जात आहे. यापूर्वी २००९ च्या टी-२० विश्वचषकात कांगारूंवर बाद फेरीपूर्वीच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी, २०२६ च्या या महाकुंभात ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा त्याच कटू अनुभवाचा सामना करावा लागला. एका पराभवापेक्षा ही 'एक्झिट' त्यांच्यासाठी अधिक क्लेशदायक ठरली आहे.
यापूर्वी २००९ मध्ये असे घडले होते. त्यावेळी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या दोन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागला होता. एकही सामना न जिंकता त्यांना मायदेशी परतावे लागले होते. आता २०२६ मध्ये झिम्बाब्वेने दिलेला २३ धावांचा धक्का ऑस्ट्रेलियाला महागात पडला. पावसामुळे आयर्लंड-झिम्बाब्वे सामन्याचा निकाल न लागल्याने ऑस्ट्रेलियाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
२०२२ : सुपर-१२ मधून बाहेर : खराब 'नेट रन रेट' (यजमान असूनही).
२०२४ : सुपर-८ मधून बाहेर : अफगाणिस्तानकडून झालेला ऐतिहासिक पराभव.
२०२६ : गट फेरीतून बाहेर : झिम्बाब्वेकडून पराभव आणि पावसाचा फटका.
२००९ नंतरची ही ऑस्ट्रेलियाची सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे. ओमानविरुद्धचा सामना आता ऑस्ट्रेलियासाठी केवळ एक औपचारिक बाब उरली आहे. सलग तीन टी-२० विश्वचषकात अपयशी ठरल्याने आता ऑस्ट्रेलियन संघात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत.