

Australia No Handshake Video
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी भारताच्या पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श आणि एलिसा हिली सारख्या खेळाडूंनी आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाच्या वादावर खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हा व्हिडिओ जारी केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आशिया चषक २०२५ दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाशी हात मिळवण्यास नकार दिला होता. संपूर्ण भारतीय संघानेही या निर्णयाचे पालन केले. भारत आणि पाकिस्तान जेव्हा तीन वेळा समोरासमोर आले, तेव्हा भारतीय खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचा 'हँडशेक' किंवा अभिवादन केले नाही. भारताने अखेरीस पाकिस्तानला हरवून आशिया चषक जिंकला, परंतु खेळापेक्षा खेळाडूंच्या या 'नो हँडशेक' भूमिकेची जास्त चर्चा रंगली.
व्हिडिओमध्ये काय?
भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियन पुरुष आणि महिला खेळाडूंनी याच घटनेवरून खिल्ली उडवली आहे. 'केयो स्पोर्ट्स' नावाच्या ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स नेटवर्कने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला निवेदक म्हणतो, 'आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत एक शानदार संघ आहे, पण आम्ही त्यांची एक मोठी कमजोरी शोधली आहे.' त्यानंतर दुसरा निवेदक म्हणतो, 'आम्हाला माहीत आहे की त्यांना पारंपारिक अभिवादन म्हणजे हँडशेक फारसा आवडत नाही, तर मग सामना सुरू होण्यापूर्वीच त्यांना गोंधळात का टाकू नये.' यानंतर नॅथन एलिस आणि ग्लेन मॅक्सवेल मुठ आणि तळहात एकत्र आपटण्याचा हावभाव करून दाखवतात. महिला संघाची कर्णधार अॅलिसा हीली नाकाला अंगठा लावून बोटे हलवत चिडवण्याचा इशारा करते.
व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचे इतरही पुरुष आणि महिला क्रिकेटपटू दाखवले आहेत जे भारतीय खेळाडूंचे अभिवादन करण्यासाठी कोणते-कोणते विचित्र मार्ग वापरायचे यावर चर्चा करत आहेत. कोणी 'हाय-फाइव्ह' दाखवत आहे, तर कोणी 'नमस्ते'ची मुद्रा करत आहे. काही खेळाडूंनी आक्षेपार्ह हावभाव केले आणि यावर सगळे हसताना दिसतात. दरम्यान, टीका झाल्यानंतर 'केयो स्पोर्ट्स'च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे, परंतु तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला वनडे पर्थमध्ये खेळला जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला ॲडलेडमध्ये दुसरा वनडे आणि २५ ऑक्टोबरला सिडनीमध्ये तिसरा वनडे खेळला जाईल. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. हे सामने २९ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर, २ नोव्हेंबर, ६ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी खेळले जातील. वनडे मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत.