

australia captain pat cummins vs bumrah wtc 2023 25
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-2025 च्या पर्वाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. हा महामुकाबला 11 जूनपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रंगेल. या लढतीसाठी ऑस्ट्रेलियन आणि द. आफ्रिकेच्या संघांची घोषणा झाली आहे. दरम्यान, कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स अंतिम सामन्यात 5 विकेट घेताच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकेल.
2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. त्याने एकूण 15 सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 73 विकेट्स घेतल्या आहेत. आता जर त्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 5 विकेट्स घेतल्या तर तो बुमराहला मागे टाकून नंबर-1 स्थान मिळवेल. यासह तो 2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
पॅट कमिन्स नेहमीच त्याच्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे यॉर्कर टाकण्याची क्षमता देखील आहे. त्याने स्वतःच्या बळावर अनेक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2023 च्या WTC फायनलमध्ये टीम इंडियाला मात देऊन विजेतेपद पटकावले. आता त्याच्या नेतृत्वाखाली कांगारू संघ पुन्हा एकदा WTC ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
पॅट कमिन्सने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 294 बळी घेतले आहेत. आता जर त्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 6 बळी घेतले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण करेल. कसोटींव्यतिरिक्त, त्याने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 143 बळी घेतले आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 66 बळी आहेत.