Virat Kohli
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी हरवून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे विजेतेपद जिंकले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या पहिल्या विजेतेपदाची वाट पाहावी लागणार आहे. आरसीबीच्या विजयात माजी कर्णधार विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली, त्याने १५ सामन्यांमध्ये ५४.७५ च्या सरासरीने ६५७ धावा काढल्या.
आयपीएल २०२५ संपल्यानंतर, भारतीय चाहत्यांच्या नजरा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारताला २० जूनपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. विराट कोहली गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने या कसोटी मालिकेचा भाग असणार नाही. कोहलीने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यामुळे तो आता फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
विराट कोहली आता ऑगस्ट महिन्यात मैदानावर दिसू शकतो. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा ४ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. कोहलीशिवाय रोहित शर्मा देखील त्या एकदिवसीय मालिकेचा भाग असेल आणि संघाचे नेतृत्वही करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. म्हणजेच, त्या सामन्यात कोहली खेळताना दिसेल. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने २० आणि २३ ऑगस्ट रोजी होतील. त्यानंतर २६ ऑगस्ट, २९ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना: १७ ऑगस्ट (रविवार), मीरपूर
दुसरा एकदिवसीय सामना: २० ऑगस्ट (बुधवार), मीरपूर
तिसरा एकदिवसीय सामना: २३ ऑगस्ट (शनिवार), चितगाव
पहिला टी-२०: २६ ऑगस्ट (मंगळवार), चितगाव
दुसरा टी-२०: २९ ऑगस्ट (शुक्रवार), मीरपूर
तिसरा टी-२०: ३१ ऑगस्ट (रविवार), मिरपूर
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आपले पूर्ण लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित करणार आहे. असे म्हटले जात आहे की, कोहलीचे अंतिम ध्येय २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक आहे, जिथे तो जेतेपद जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देऊ इच्छितो. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. म्हणजेच त्या विश्वचषकासाठी अजूनही दोन वर्षांहून अधिक काळ शिल्लक आहे.