

नागोया/जपान: मागील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील विक्रमी कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भारताचा मानस असला तरी यंदा खेळाडूंच्या संख्येत झालेली मोठी घट आणि दोन क्रीडा प्रकारांतील निवडीवरून उद्भवलेला वाद यामुळे मागील १११ पदकांची कमाई गाठणे भारतीय पथकासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
मागील आवृत्तीत भारत अवघ्या एका सुवर्णपदकाच्या फरकाने दक्षिण कोरियाकडून चौथे स्थान गमावून पाचव्या स्थानावर राहिला होता. हँग्झू स्पर्धेत भारताला तब्बल ५५ पदके (१८ सुवर्ण, १७ रौप्य आणि २० कांस्य) मिळवून देणारा पॅरा-ॲथलेटिक्स विभाग यंदाही मोहिमेच्या केंद्रस्थानी असेल. मात्र, या प्रकारातील भारतीय खेळाडूंची संख्या १२३ वरून थेट ६२ वर आली आहे.
पॅरालिम्पिक विजेता आणि जागतिक विक्रमवीर भालाफेकपटू सुमित अंतिल (एफ ६४ प्रकार) भारताच्या प्रमुख पदक दावेदार खेळाडूंमध्ये आघाडीवर असेल. याव्यतिरिक्त, उंच उडीपटू निशाद कुमार, महिलांच्या टी ३५ श्रेणीतील १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणारी धावपटू प्रीती पाल आणि क्लब थ्रोअर धरमबीर सिंग हे अनुभवी खेळाडू पदकांची संख्या वाढवतील, अशी अपेक्षा आहे.
हात नसलेली प्रतिभावान तिरंदाज शीतल देवी कम्पाऊंड प्रकारात भारताची मुख्य पदक आशा असेल. अवघ्या १९ वर्षीय शीतलने हँग्झू येथे दोन सुवर्णपदके पटकावली होती, तसेच त्यानंतर तिने वैयक्तिक जागतिक विजेतेपदही नावावर केले आहे.
मागील आवृत्तीतील एकेरीतील सुवर्णपदक विजेता तसेच यंदा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणारा प्रमोद भगत आणि सुहास एल. वाय. हे या क्रीडा प्रकारात भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील.
यंदाची स्पर्धा ठरणार अधिक आव्हानात्मक
चीनमधील हँग्झू येथे २०२३ मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताने २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्यपदकांसह एकूण १११ पदके पटकावून पाचवे स्थान मिळवले होते. या बहु-क्रीडा स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
ऐची-नागोया येथील आव्हान मात्र पूर्णपणे वेगळे आहे. चीनमध्ये भारताचे ३०३ खेळाडू उतरले होते; तर यंदा ११ क्रीडा प्रकारांत केवळ सुमारे १६८ ॲथलीटस् देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. कठोर कोटा पद्धती आणि स्पर्धा प्रकारांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळाडूंच्या संख्येत ही कपात झाली आहे.
मानसी-तुलसीमती उपांत्य फेरीत; पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित
नागोया : स्पर्धेतील काही इव्हेंटस्ना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली असून, मानसी जोशी आणि तुलसीमती मुरुगेसन या भारतीय जोडीने पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारत सलग दुसऱ्या सत्रात भारताचे पदक निश्चित केले. या जोडीने चीनच्या युमेई लियू आणि टोंगटोंग ली यांचा २१-१०, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
भाविना पटेलची विजयी घोडदौड कायम
नागोया : पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी मालिका कायम राखत शनिवारी महिला पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत जॉर्डनच्या फातेन एलिमतचा पराभव केला. महिला एकेरीच्या क्लास ४-५ मधील गट ‘अ’च्या लढतीत भाविनाने अवघ्या १७ मिनिटांत एलिमतवर ११-६, ११-७, ११-४ अशी मात केली आणि आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले.
पॅरा आशियाई स्पर्धा
स्पर्धेचा कालावधी : १८ ते २४ ऑक्टोबर
सहभागी देश : ४५
ॲथलिटस् : २७००
पदाधिकारी : १३००
एकूण खेळ : १८
एकूण इव्हेंटस् : १९
सुवर्णपदकांचे इव्हेंटस् : ४९२
भारतीय ॲथलिटस् : १६८
पुरुष : ११२, महिला : ५६