

दुबई : थायलंडविरुद्धच्या विजयानंतर सात वेळचा चॅम्पियन भारतीय महिला संघ आज (दि. ३) महिला टी-२० आशिया चषकातील आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात ‘हाँगकाँग चीन’विरुद्ध मैदानात उतरेल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत विजय मिळवून बाद फेरीतील स्थान भक्कम करण्यासोबतच फलंदाजीतील सातत्य परत मिळवण्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संघाचा भर असेल.
यापूर्वी, पहिल्या सामन्यात भारताने थायलंडवर ९४ धावांनी मोठा विजय नोंदवला असला, तरी संघाच्या मध्यफळीतील पडझड पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली. भारताच्या गोलंदाजांनी मात्र सामन्यावर पूर्ण पकड ठेवत ही उणीव भरून काढली होती.
दुसरीकडे, थायलंडविरुद्ध अवघ्या सहा धावांनी निसटता पराभव पत्करावा लागलेल्या हाँगकाँग संघाला या सामन्यात आपल्या त्रुटी सुधाराव्या लागतील. भारताच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यासाठी हाँगकाँगची भिस्त मरिना आणि कॅरी चॅनवर असेल. पाकिस्तानविरुद्धची हायव्होल्टेज लढत आणि नॉकआऊट टप्प्यापूर्वी भारतासाठी फलंदाजीतील त्रुटी दुरुस्त करण्याची ही उत्तम संधी ठरेल.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकूर, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, प्रतिका रावल.
हाँगकाँग चीन : नताशा माईल्स (कर्णधार), मरियम बीबी, चॅन का यिंग, चॅन साऊ हा, चॅन शिंग यान डोरोथिया, इक्रा सहर, जॉयलीन कौर, महकदीप कौर, मारिको हिल, मरिना लॅम्पलो, रुचिथा व्यंकटेश, शंझेन शाहझाद, सिऊ मेई वाई, वोंग विंग किउ हेली, यास्मिन दासवाणी.