Asia Cup 2023 : चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?

Asia Cup 2023 : चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार्‍या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोमवारी एक बैठक आयोजित केली होती त्यानंतर 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. बैठक संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन संघाच्या अनेक समस्यांवर आपली उत्तरे दिली. त्यापैकी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीच्या समस्येवरही खुलासा केला. (Asia Cup 2023)

तिघे जण दावेदार

भारतीय संघासमोर सर्वात मोठी समस्या चौथ्या क्रमांकाची आहे. यासाठी संघाने अनेक खेळाडूंना या क्रमांकावर फलंदाजीसाठी आजमावून पाहिले; पण या क्रमांकावर जबाबदारीने फलंदाजी करणारा फलंदाज आजतागायत गवसलेला नाही. नुकतेच आशिया कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे या स्थानावर खेळू शकतात; पण ते किती यशस्वी ठरतील, हे येणार्‍या सामन्यांतून स्पष्ट होईल. यामध्ये श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांचे नाव आघाडीवर आहे. (Asia Cup 2023)

श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी दावेदार?

भारताच्या आशिया कप संघात अनेक मधल्या फळीतील फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? हे अद्याप निश्चित झाले नसले, तरी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे मानले जात आहे. विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. जर के. एल. राहुल सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते; परंतु इशानची समस्या ही आहे की, तो ओपनिंगमध्येच वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करतो; मग त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेणार का? या प्रश्नाचे उत्तर अगामी स्पर्धेतून मिळेल.

संघात सगळ्याच जागा महत्त्वाच्या

फक्त एका स्थानावर चांगली फलंदाजी करून सामने जिंकले जाऊ शकत नाहीत. हे खरे आहे की, नंबर चारच्या फलंदाजाची भूमिका महत्त्वाची असते; पण तो प्रत्येकवेळी एकट्याच्या जोरावर तुम्हाला सामना जिंकून देईलच, हे शक्य नसते. संघासाठी 5, 6 आणि 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडूसुद्धा मॅच विनरची भूमिका ताकदीने पार पाडू शकतात. अक्षर पटेलला नंबर चारवर आजमावण्यात आले. आम्ही अनेक प्रयोग केले; पण चांगले परिणाम आले नाहीत. विश्वचषकापूर्वी आमचे 9 सामने आहेत आणि त्या सर्वांना संधी मिळेल, असे भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news