

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांची मुलगी अनया बांगर (Anaya Bangar) पुन्हा चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान क्रिकेट जगतातील विषारी पुरुषत्व म्हणजेच 'टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी'बद्दल मोठा खुलासा केला आहे. अनया बांगर अगोदर मुलगा होती. पण त्यानंतर आर्यन याची "ट्रान्स वुमन" म्हणून ओळख पुढे आली. हार्मोन रिप्लेसमेंटद्वारे 'आर्यन' (Aryan) ची 'अनाया' (Anaya) बनली. गेल्या वर्षी तिने १० महिन्यांच्या हार्मोनल बदलाचा प्रवास व्हिडिओतून शेअर केला होता. आता ती "ट्रान्स वुमन" म्हणून समोर जाताना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल बोलली आहे.
अनाया बांगरने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ज्यांनी मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळले आहे; अशा काही क्रिकेटपटूंनी मला न्यूड फोटो पाठवले. हे केवळ त्यांना माझ्या ट्रान्स आयडेंटिटीबद्दल कळाले होते म्हणून झाले. त्यांना वाटत होते की यानंतर काहीतरी घडेल.
अनायाला विचारण्यात आले की तिने त्या क्रिकेटपटूंच्या मेसेजना उत्तर दिले का? त्यावर अनाया म्हणते, ''मला केवळ सुरक्षित राहायचे होते. मला हे नको होते की कोणीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहू नये. म्हणून मी संपूर्ण परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. जे मला फोटो पाठवायचे ते माझे मित्र नव्हते. हे कोणत्या प्लॅटफॉर्मवर घडले हे मी मात्र सांगू शकत नाही. पण माझ्याबाबतीत ते घडले.''
अनया एक क्रिकेटपटू राहिली आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, मी युकेमध्ये असतानाही काही लोकांनी मला पाठिंबा दिला. जे लोक आधी मला पाठिंबा देत होते, तेच लोक नंतर बदलले. ते माझे विरोधक झाले. तो माझ्या टीममधील सहकाऱ्यांसमोरच मला शिवीगाळ करायचे. ते म्हणायचे, हे ट्रान्स-वांस काय आहे? हे सर्व काही नसून हा सर्व मूर्खपणा आहे. मग तोच माणूस नंतर मॅचदरम्यान माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि माझ्याकडे फोटो मागायचा.
समाजातील विषारी पुरुषत्वाबाबत बोलताना ती म्हणाली, 'ट्रान्स- वुमन'ना वाईट नजरेने पाहिले जाते. आम्ही एक माणूस आहोत. आम्हालाही समान आदर मिळावा अशी आमची इच्छा आहे. माझ्यासोबत जे काही घडले ते केवळ एक भाग आहे. माझ्यासारख्या अनेक 'ट्रान्स- वुमन' आहेत ज्यांना माझ्यापेक्षा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षी, 'अनाया'चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिने या व्हिडिओतून १० महिन्यांच्या हार्मोनल बदलाचा प्रवास शेअर केला होता. 'आर्यन'ची बनलेली 'अनाया' सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते. एका पोस्टमध्ये तिने तिच्या क्रिकेटवरील प्रेमाबद्दल सांगितले होते. माझ्यावरील शस्त्रक्रियेनंतर खेळापासून कसे दुरावले?. याबद्दल तिने खंत व्यक्त केली होती. तिने बॅटिंग कोच म्हणून काम केलेल्या त्याच्या वडिलांकडून प्रेरणा कशी घेतली? याचाही उल्लेख पोस्टमध्ये केला होता.