

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संजू सॅमसनची २२ चेंडूंतील ५७ धावांची दमदार खेळी व नितीशकुमार रेड्डी, अर्शदीप यांच्या एकत्रित ५ बळींच्या जोरावर भारताने येथील दुसर्या टी-२० सामन्यातही अफगाणचा ७ गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला आणि ३ सामन्यांची ही मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली. भारताने या लढतीत अफगाणला २० षटकांत ८ बाद १५९ धावांवर रोखल्यानंतर १४.५ षटकांत ३ बाद १६३ धावांसह विजय संपादन केला.
विजयासाठी १६० धावांचे आव्हान असताना भारतातर्फे संजू सॅमसनने सर्वाधिक ५७ धावांचे योगदान दिले, तर अभिषेक शर्मा (१९ चेंडूंत ३९) व इशान किशन (२३ चेंडूंत नाबाद ३८) यांनीही फटकेबाजी केली. इशानने तिलक वर्माच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. प्रारंभी, नितीशकुमार रेड्डी (३/२४) आणि अर्शदीप सिंग (२/३५) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने सुरुवातीला वर्चस्व राखले; मात्र अखेरच्या षटकांत केलेल्या प्रतिकारामुळे अफगाणिस्तानने ८ बाद १५९ धावांची मजल मारली.
एका क्षणी १५ व्या षटकात ६ बाद १०५ धावा अशी स्थिती असणार्या अफगाणने उर्वरित खेळात आणखी ५४ धावांची भर घातली. राशीद खानने १६ चेंडूंत ३ चौकार, एका षटकाराच्या मदतीने २८, तर मोहम्मद नबीने १४ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह २० धावांचे योगदान दिले. नितीशकुमार रेड्डीने ३ षटकांत २४ धावांच्या बदल्यात ३, तर अर्शदीप सिंगने ३५ धावांत २ बळी घेतले. याशिवाय, बुमराह, अक्षर, रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. उभय संघातील तिसरी व शेवटची टी-२० उद्या (दि. १७) रोजी खेळवली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
अफगाण : २० षटकांत ८ बाद १५९. इब्राहिम झद्रान ३३ चेंडूंत ३७, रसुली २६, राशीद खान १६ चेंडूंत २८. नितीशकुमार रेड्डी ३ षटकांत ३/२४, अर्शदीप सिंग ४ षटकांत २/३५.
भारत : १४.५ षटकांत ३/१६३. (संजू सॅमसन २२ चेंडूंत ५७, अभिषेक शर्मा १९ चेंडूंत ३९, इशान किशन २३ चेंडूंत नाबाद ३८. राशीद खान ३.५ षटकांत ३/३६).