Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला नेटक-यांनी घातल्या शिव्या, कारण… (Video) | पुढारी

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजला नेटक-यांनी घातल्या शिव्या, कारण... (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार डीन एल्गरच्या झुंजार 96 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या पराभवापेक्षा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) सध्या चर्चा सुरू आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले, तोच सिराज जो या सामन्यात विशेष काही करू शकला नाही आणि विकेट घेण्यासाठी झगडत राहिला. त्याचवेळी, मॅचच्या शेवटी त्याने असे काही केले की सोशल मीडियावर लोकांनी सिराजला निशाण्यावर घेतले आणि त्याची कानउघणी केली.

Dean Elgar

अत्यंत कमी कालावधीत मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कसोटी फॉरमॅटमध्ये नाव कमावले. ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंत या गोलंदाजाने धुमाकूळ घातला. त्याने अनेक दिग्गजांना आपल्या गोलंदाजीचे चाहते बनवले. सिराज हा विराटचा एक खास गोलंदाज आहे. पण आफ्रिकेत या खेळाडूच्या गोलंदाजीची धार गायब झाल्याचे चित्र आहे. जोहान्सबर्ग कसोटीत सिराज ना विकेट काढू शकला ना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव टाकू शकला. यामुळे सामन्याच्या चौथ्या त्याची चिडचिड दिसली. त्याने सामन्याच्या अखेरच्या वेळेत द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरसोबत वाद घातला. त्याच्या या कृतीमुळे मैदानात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सामन्याच्या चौथ्या दिवशी सिराजने (Mohammed Siraj) आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरशी वाद घातला. दोघांमध्ये सामना सुरू असतानाच मैदानात तू-तू-मैं-मैं झाली. त्यामुळे मैदानातील वातावरण चांगलेच तापले. मैदानी पंच आणि कर्णधार केएल राहुल यांनी मध्यस्थी केली आणि दोघांशी संवाद साधून वाद मिटवला. दुसरीकडे, सिराजच्या या कृतीवर चाहते चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडियावर सिराजच्या विरोधात ट्विट केले गेले आहेत.

चौथ्या दिवशी पाऊस पडल्याने खेळपट्टीवर फलंदाजी करणेही अवघड होते, पण द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कर्णधार एल्गरने संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. द. आफ्रिकन संघासाठी प्रतिकुल परिस्थिती होती. असे असूनही भारतीय गोलंदाज त्यांच्यावर दबाव टाकण्यात असहाय्य दिसले. त्यातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला ही असहायता सहन झाली नाही आणि तो दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराशी भिडला.

या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली. मग ऋषभ पंत-रॅसी विरुद्ध व्हॅन डेर ड्युसेन, किंवा जसप्रीत बुमराह विरुद्ध मार्को जेन्सन यांच्यातील वाद असो. काल (दि. ६) सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा वाद झाला.

Back to top button