पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant Catch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एका झेलवरून वादाला तोंड फुटले आहे. हा झेल रासी व्हॅन ड्युसानचा आहे, जो लंच ब्रेकच्याआधी शार्दुलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने पकडलेला त्याचा झेल हा 'क्लीन' होता का? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर आणि आकाश चोप्रा देखील कॉमेंट्रीमध्ये यावर प्रश्न विचारताना दिसले.
सुनील गावस्कर म्हणाले की, जर फलंदाजाला शंका असेल तर त्याने थांबायला हवे होते आणि त्याच्याकडे डीआरएसचा पर्याय होता. आजच्या काळात असे कोणी जात नाही. त्याला जराही शंका आली असती तर तो क्रिजवर थांबला असता. मला वाटतं आम्ही स्लो मोशनमध्ये पाहिलं त्यामुळे ते तसं दिसलं.
दुसरीकडे आकाश चोप्राने सांगितले की, तो नॉटआऊट असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे, मात्र व्हिडिओमध्ये संपूर्ण बाब स्पष्ट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शार्दुल ठाकूरने लंच ब्रेकपूर्वी ३ बळी घेत भारताचे सामन्यात पुनरागमन केले. त्याने ४.५ षटकात ८ धावा देत ३ बळी घेतले. त्याने डीन एल्गर (१२० चेंडूत २८) आणि युवा कीगन पीटरसन (११८ चेंडूत ६२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पीटरसनचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच अर्धशतक आहे. एका वेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या एका विकेटवर ८८ अशी होती पण अर्ध्या तासात त्यांनी १४ धावांत तीन विकेट गमावल्या. शार्दुलने पहिल्या डावात ७ बळी घेत द. आफ्रिकेचे कंबरडे मोडले.