पुढारी ऑनलाईन डेस्क : सेंच्युरियन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत यजमान संघाला दुसऱ्या डावात १९१ धावांत गुंडाळले. संघाच्या विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधार कोहली म्हणाला की, 'आम्हाला जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मिळाली. एक दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला. चार दिवसांत सामन्याचा निकाल लागला यावरून आम्ही किती चांगला खेळ केला हे कळते.
आम्ही फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सर्वच विभागात चांगली कामगिरी केली. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. तसेच परदेशात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणे अवघड असते. पण तरीही मोठी धावसंख्या उभी करण्याचे श्रेय मयंक आणि केएल यांच्या खेळाला जाते', असे त्याने सांगितले.
कोहली (Virat Kohli) पुढे म्हणाला की, आम्हाला माहित आहे की आम्ही ३००-३२० पेक्षा जास्त स्कोअरसह विजयी स्थितीत आहोत. गोलंदाज काम करतील याची मला कल्पना होती. पहिल्या डावात मी बुमराहकडून जास्त गोलंदाजी करून घेतली नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सुमारे ४० धावा मिळाल्या. टीम इंडियाचे गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतात हे आमच्या संघाचे वैशिष्ट्य आहे.
ते कठीण परिस्थितीत निकाल मिळवून देतात. शमीकडे जागतिक दर्जाची प्रतिभा आहे. माझ्यासाठी तो सध्या जगातील सर्वोत्तम तीन वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यांचे मनगट मजबूत आहे. त्याची लाईन लेन्थ अप्रतिमा आहे', असे कौतुक त्याने केले.