IND vs SA : टीम इंडिया दुसरा डाव ‘असा’ घोषित करणार, मोहम्मद शमीने उघड केले.. | पुढारी

IND vs SA : टीम इंडिया दुसरा डाव ‘असा’ घोषित करणार, मोहम्मद शमीने उघड केले..

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सेंच्युरियनमध्ये खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. भारतीय संघाला आता हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, त्यासाठी भारताला त्यांचा दुसरा डाव योग्य वेळी घोषित करावा लागेल. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारतीय संघ आपला दुसरा डाव कधी घोषित करू शकतो याचे गुपित उघड केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली स्थिती मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसानंतर भारताने दुसऱ्या डावात 16/1 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत आटोपला. त्यामुळे तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची एकूण आघाडी १४६ धावांवर गेली. आज (दि. २९) सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या तासाभराच्या खेळातच टीम इंडियाने शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल या दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. यावेळी संघाची धावसंख्या ३ बाद ५४ होती. एकूण आघाडी १८४ धावांपर्यंत पोहचली होती. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने संयमी खेळ करून भारताची एकून आघाडी दोनशेच्या पार नेली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या डावात ५ विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने (mohammed shami) टीम इंडिया कधी डाव घोषित करू शकते? याबाबत खुलासा केला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने हे गुपित उघड केले. सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघ चौथ्या दिवशी आफ्रिकन संघाला ४०० धावांचे लक्ष्य देऊन फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहे. दुसऱ्या डावात २५० धावा करून आफ्रिकन संघाला ४०० धावांचे लक्ष्य द्यायचे आहे, असे त्याने सांगितले. आम्ही किमान ३५० धावांचे लक्ष्य देण्याचा प्रयत्न करू. चौथ्या सत्रात आफ्रिकेला आम्ही फलंदाजी देऊ शकतो, असेही तो म्हणाला. (IND vs SA)

वडिलांना श्रेय…

शमीने (mohammed shami) २०० बळी घेण्याचे संपूर्ण श्रेय वडील आणि भावाला दिले. वडिलांची आठवण करून तो भावूक झाला. २०१७ मध्ये शमीच्या वडिलांचे निधन झाले. सर्वात वेगवान २०० बळी घेणारा शमी तिसरा भारतीय गोलंदाज आहे. शमीने ५५ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्यांच्या पुढे कपिल देव (५० कसोटी) आणि जवागल श्रीनाथ (५४ कसोटी) आहेत.

शमी म्हणाला, ‘मी आज ज्या ठिकाणी आहे आणि जो काही आहे, त्याचे सर्वाधिक श्रेय माझ्या वडिलांना जाते. कारण मी अशा भागातून आलो आहे जिथे फारशा सुविधा नव्हत्या.

Image

दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुलने २६० चेंडूत १२३ धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावाला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १९७ धावांत आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने ५ विकेट घेतल्या. तर बुमराह-शार्दुलने २-२ आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गडी गमावून १६ धावा केल्या होत्या. (IND vs SA)

Back to top button