पुढारी ऑनलाईन डेस्क : वनडे संघाचे कर्णधारपद गमावल्यानंतर अखेर विराट कोहलीने आज (दि. १५) मौन सोडले (BCCI vs Virat Kohali). त्याने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधत स्वत:ची बाजू जगासमोर मांडली. यावेळी त्याने रोहित शर्मासोबत कसलाही वाद नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मुलीचा वाढदिवस आणि विश्रांतीसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून तो माघार घेत असल्याच्या अफवांचे खंडन केले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून का काढण्यात आले हे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. खरं तर, अलीकडेच विराट कोहलीला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले. यानंतर विराट कोहली स्वतः कर्णधारपद सोडू इच्छित नसल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि भारतीय क्रिकेट जगतात यामुळे खळबळ उडाली. (BCCI vs Virat Kohali)
कोहलीने नुकतेच टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 संघाचे कर्णधारपद सोडले. त्या नंतर रोहित शर्माला त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. दुसरीकडे, गेल्या आठवड्यातच एकदिवसीय कर्णधारपदावरून विराटला हटवण्यात आले. भारताच्या क्रिकेट बोर्डाने हा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला. यापुढे रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार असेल असे बीसीसीआयच्य निवड समितीने ट्विट करत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी कसोटी संघाबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकाच्या खाली कर्णधारपदाच्या फेरबदालाबाबत माहिती देऊन आश्चर्यकारक घोषणा केली. (BCCI vs Virat Kohali)
दक्षिण आफ्रिकेला संघ रवाना होण्यापूर्वी बुधवारी पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला, ''कसोटी मालिकेसाठी ८ तारखेला होणाऱ्या निवड बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्या आधी माझ्याशी कोणताही पूर्व संवाद साधला गेला नाही. मुख्य निवडकर्त्याने कसोटी संघाबाबत चर्चा केली. कॉल संपण्यापूर्वी निवडकर्त्यांनी मला सांगितले की मी यापुढे वनडे संघाचा कर्णधार राहणार नाही. मी 'ठीक आहे' असे उत्तर दिले. त्या निर्णयाचा मला त्रास झाला नाही.'' (BCCI vs Virat Kohali)
पत्रकार परिषदेदरम्यान विराटने वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याच्या म्हणण्यानुसार. तो आयसीसीचे एकही विजेतेपद जिंकू शकला नाही आणि याच कारणामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. पत्रकार कोहली म्हणाला, ''माझ्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून का काढून टाकण्यात आले याची पुरेपुर माहिती आहे.'' (BCCI vs Virat Kohali)
विराट कोहलीने आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, त्याला कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळायचे होते. याची माहिती त्यांने बीसीसीआयलाही दिली होती. मात्र, बोर्डाने विराटशी चर्चा न करता त्याला कर्णधारपदावरून हटवले आणि रोहित शर्माला वनडेचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. भारतीय संघात कोणताही त्रास नको म्हणून विराटने बोर्डाने घेतलेला हा निर्णय मान्य केला.
त्याचवेळी विराट कोहलीच्या या पत्रकार परिषदेपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वत: मीडियासमोर येऊन कर्णधारपदाच्या वादावर खुलासा केला. ते म्हणाले होते की, ''विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडावे असे बोर्डाला वाटत नव्हते, यासाठी बोर्डाने विराटशी चर्चाही केली होती. याबाबत मीही विराटशी बोललो होतो. पण विराटने ते मान्य केले नाही. त्यानंतर बोर्डाने रोहित शर्माला T20 आणि ODI मध्ये कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला.''
मात्र, आज विराट कोहलीने गांगुली यांनी सांगितलेल्या त्या गोष्टींचा साफ इन्कार केला असून त्यांना एक प्रकारे खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. विराटच्या या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट जगतात आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.