Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा विजय हजारे स्पर्धेत शतकी चौकार | पुढारी

Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा विजय हजारे स्पर्धेत शतकी चौकार

राजकोट; पुढारी ऑनलाईन : ऋतुराज गायकवाडची ( Ruturaj Gaikwad ) बॅट सध्या भलतीच तळपली आहे. त्याने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy 2021-22) पाचव्या सामन्यात चंदीगड विरुद्ध या मालिकेतील चौथे शतक झळकावले आहे. त्याच्या १३२ चेंडूत १६८ धावांची धमाकेदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्रने चंदीगडवर पाच गडी राखून विजय मिळवला.

चर्चा फक्त ऋतुराजचीच ( Ruturaj Gaikwad )

ऋतुराज गायकवाड सध्या खोऱ्याने धावा करत आहे. त्याने यंदाचे आयपीएल देखिल गाजवले होते. आयपीएल २०२१ मधील सीझनमध्ये त्याने ६३५ धावा करुन त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच्या या खेळीमुळे चैन्नई सुपर किंग्ज याने ऋतुराजला रिटेन देखिल केले आहे. सध्या त्याचा फॉर्म पाहता लवकरच भारतीय संघात त्याची वर्णी लागेल यात शंका नाही. ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या पाच पैकी चार सामन्यांत शतक झळकावले. चंदीगढ विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि सहा षटकार मारले. त्यापूर्वी ऋतुराजने मध्य प्रदेशविरुद्ध 136, छत्तीसगढ विरुद्ध नाबाद 154 आणि केरळ विरुद्ध 124 धावांची खेळी केली. सलग तीन शतके झळकावल्यानंतर ऋतुराजने चौथ्या लढतीत 21 धावांची खेळी केली. या मालिकेत त्याने पहिल्या पाच सामन्यातच ६०० हून अधिक धावा कुटल्या आहेत.

कोहलीची ( virat kohli ) केली बरोबरी ( Ruturaj Gaikwad )

विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये ऋतुराज गायकवाड याने ४ शतके ठोकत त्याने विराट कोहली ( virat kohli ) , देवदत्त पडिक्कल ( devdutt padikkal ) आणि पृथ्वी शॉ ( prithvi shaw )यांच्याशी बरोबरी केली आहे. या सर्व फलंदाजांनी देखिल विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत एका सीझनमध्ये ४ षटके लगावली आहेत.

महाराष्ट्राने चंदीगड विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चंदीगड संघाने मनन वोहरा (141), आर्सलान खान (87) आणि अंकित कौशिक (56) यांच्या खेळीच्या जोरावर 7 बाद 309 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करणार्‍या महाराष्ट्राने ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीमुळे 48.5 षटकांत 5 बाद 313 धावा करीत विजय मिळवला.

गतविजेता मुंबई पराभूत

गतविजेत्या मुंबई संघाला पाँडिचेरीकडून 18 धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. पाँडिचेरी संघाचा डाव 157 धावसंख्येवर आटोपला; पण मुंबईच्या आकर्षित गोमेल (70) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही व संघाला 139 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. पाँडिचेरीकडून फबिद अहमदने 16 धावांत चार विकेटस् मिळवल्या.

Back to top button