महेंद्रसिंग धोनीने रांचीत बजावला मतदानाचा हक्क | पुढारी

महेंद्रसिंग धोनीने रांचीत बजावला मतदानाचा हक्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटमधील स्टार आयकॉन महेंद्रसिंग धोनी नेहमीच चाहत्यांसाठी मुख्य आकर्षण केंद्र ठरत आला आहे. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यांतर्गत महेंद्रसिंग धोनीने आज कुटुंबियांसह रांची येथील मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाचा हक्क बजावला. धोनीला पाहण्यासाठी यावेळी देखील चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. महेंद्रसिंग धोनीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाला होता. रांचीच्या श्यामली कॉलनीतील जेव्हीएम शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. महेंद्रसिंग धोनी मतदान केंद्रावर पोहोचताच मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. महेंद्रसिंग धोनीचे वडील पान सिंग धोनी, आई देवकी देवी, पत्नी साक्षी धोनी आणि भाऊ नरेंद्र सिंग यांनी धोनीसोबत जेव्हीएम स्कूल येथे सर्वांनी मतदान केले.

महेंद्रसिंग धोनी पूर्वी श्यामली कॉलनीत राहत होता. त्याचे वडील मॅकॉन कंपनीत काम करत होते. त्यामुळे आजही संपूर्ण कुटुंब मेकॉन कॉलनीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जातात. महेंद्रसिंग धोनी सध्या रिंग रोडवर असलेल्या त्याच्या नवीन फार्म हाऊसमध्ये राहतो. मात्र प्रत्येक निवडणुकीत ते त्यांच्या जुन्या घराजवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येतात.

धोनीच्या इव्हेंटकडे पाठीराख्यांचे लक्ष

यंदा चेन्नई सुपरकिंग्जला प्ले ऑफसाठी पात्र ठरता न आल्याने या संघाच्या समर्थकांची निराशा होणे साहजिक होते. पण, तरीही धोनीची क्रेझ कमी होण्याचे काहीच कारण नव्हते. सध्या धोनी फक्त आयपीएलमध्येच खेळत असल्याने या इव्हेंटकडे त्याच्या पाठीराख्यांचे बारीक लक्ष असते. धोनीने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांत १६१ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २२०.५४ इतका राहिला. त्याने यंदा १४ चौकार व १३ षटकार फटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी विजेतेपद जिंकली आहेत.

हेही वाचा : 

Back to top button