

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
IND vs NZ 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुंबईत होणाऱ्या दुसरा कसोटी सामन्यातून ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. दुखापतीमुळे या तिघांना दुसऱ्या कसोटीतून बाहेर रहावे लागले असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यालाही दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले आहे.
कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य रहाणेच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती. तो पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. तो वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
दुसरा कसोटी सामना आज शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. दरम्यान, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धावा करण्याची चांगली संधी आहे. रन मशिन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराटला २०१९ पासून कोणत्याही प्रकारात शतक करता आलेलं नाही. पुजाराला सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून शतक झळकवता आलेलं नाही. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कर्णधार विराट कोहली आणि पुजारासाठी लाभदायक ठरली आहे.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या मुंबई कसोटीमध्ये पाऊस जरी थांबला असला तरीही भारतीय संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. पावसामुळे यापूर्वीच नाणेफेकिला उशीर झाला असून ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीबाहेर गेले आहेत. ईशांतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तर, जडेजाचा देखील उजव्या हाताचा स्नायू दुखावला आहे. कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी अजिंक्य रहाणेला दुखापत झाली होती. त्यामधून तो अजूनही सावरलेला नाही. तीन महत्वाचे खेळाडू संघाबाहेर गेल्याने आता कर्णधार विराट कोहलीसमोर आव्हान असेल. पावसामुळे आऊट फिल्ड खराब झाल्याने सुरुवातीला 9.30 ला मैदानाची पाहणी करण्यात आली. आता पुन्हा एकदा 10.30 वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर नाणेफेकीचा निर्णय घेण्यात येणार आहे.