KKR vs RCB : ‘केकेआर’चे लक, ‘आरसीबी’चे बॅडलक; कोलकाताचा बंगळुरूवर केवळ एक धावाने विजय | पुढारी

KKR vs RCB : 'केकेआर'चे लक, 'आरसीबी'चे बॅडलक; कोलकाताचा बंगळुरूवर केवळ एक धावाने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेवटच्या षटकापर्य़ंत क्रिकेटचा थरार चाहत्यांना अनुभवायाला लावणाऱ्या सामन्यात कोलकातने बंगळुरूवर केवळ १ धावाने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला आणि कोलकाताने बंगळुरूचा विजयाचा घास हिरवला. (KKR vs RCB)

सामन्याकत प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, पण संघाला एकच धाव करता आली आणि पराभवाला सामोरे जावे लागले. विल जॅक आणि रजत पाटीदार यांच्यातील शतकी भागीदारी आणि शेवटच्या षटकात करण शर्माची उत्कृष्ट कामगिरी असूनही 20 षटकात 221 धावा करत आरसीबी सर्वबाद झाला.

केकेआरसाठी श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले आणि अखेरीस रसेल आणि रमणदीप सिंगने वेगवान खेळी करत आरसीबीसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र जॅकने 32 चेंडूत 55 धावांची तर रजत पाटीदारने 52 धावांची खेळी करत आरसीबीला सामन्यात रोखले. तथापि, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी मधल्या षटकांमध्ये नियमित अंतराने आरसीबीच्या विकेट घेतल्या आणि केकेआरला सामन्यात परत आणले. आरसीबीचे फलंदाज वेगवान खेळ करत राहिले, पण दुसऱ्या टोकाकडून संघ विकेट्स गमावत राहिला.

आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज होती. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. स्टार्कला कर्ण शर्माने तीन षटकार ठोकले. त्यावेळी आरसीबीला दोन चेंडूत तीन धावा हव्या होत्या, पण स्टार्कने कुर्णला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन स्ट्राइकवर होता. फर्ग्युसन दोन धावांवर धावला, पण एक धाव पूर्ण केल्यानंतर तो धावबाद झाला. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला. (KKR vs RCB)

तत्पूर्वी, तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि फिल सॉल्ट आणि रमणदीप सिंग यांच्या वेगवान खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने बंगळुरूसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामीच्या जोडीने केकेआरला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 26 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. सॉल्टने लॉकी फर्ग्युसनच्या षटकातून 28 धावा केल्या, मात्र मोहम्मद सिराजने सॉल्टला बाद करून अर्धशतक झळकावण्यापासून रोखले. यानंतर केकेआरचा डाव फसला आणि संघाने 97 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले, मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर तोही बाद झाला.

सरतेशेवटी, रमणदीप सिंगने वेगवान खेळी खेळल्यामुळे कोलकातने बंगळुरूला 223 धावांचे लक्ष्य दिले. रमणदीपने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 24 धावा केल्या. आंद्रे रसेलने दुसऱ्या टोकाकडून रमणदीपला चांगली साथ दिली आणि रसेल 20 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 27 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा :

Back to top button